Chandgad | साऊंड सिस्टीमवरून अडकूरमध्ये राडा; पिता-पुत्राला काठीने मारहाण
सिस्टीम बंद करण्याच्या वादातून हाणामारी; अडकूरमध्ये पिता-पुत्र जखमी
चंदगड - साऊंड सिस्टीम वाजवण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून मारहाणीची घटना अडकूर येथे घडली. या घटनेत फिर्यादीसह त्यांच्या वडिलांना मारहाण करण्यात आली असून दोघे जखमी झाले आहेत.
याबाबत चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर निवृत्ती सुतार (वय २५, रा. अडकूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ५ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास बळीराजा बँकेसमोर ते साऊंड सिस्टीम विक्रीसाठी दाखवत होते.
यावेळी शेजारी राहणारे शुभम संतोष शिवणगेकर व श्रावण संतोष शिवणगेकर यांनी सिस्टीम बंदकरण्यास सागत वाद घातला. वाद वाढताच आरोपी शुभम शिवणगेकर याने फिर्यादीच्या वडिलांना शिवीगाळ करून त्यांची गळपट धरून मारहाण केली. त्यांना सोडविण्यासाठी फिर्यादी पुढे गेले असता, दुसरा आरोपी श्रावण शिवणगेकर याने पाठीमागून येत काठीने फिर्यादीच्या डोक्यात वार केला.
तसेच दोघांनी मिळून फिर्यादीच्या वडिलांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पुन्हा सिस्टीम लावल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. जखमींवर गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.