Crime News: झाला वाद, केला गोळीबार, आठ दिवसांत तीनवेळा बंदूक उगारण्याच्या घटना
गेल्या 8 महिन्यांत 10 पिस्तूल, 3 रिव्हॉल्वर, 2 बंदूक जप्त केल्या आहेत
By : आशिष आडिवरेकर
कोल्हापूर : भागात आपला वट, दहशत माजवण्यासाठी फाळकूट दादांकडून वापरण्यात येणारी तलवार, चाकू, फायटर आता मागे पडले आहेत. याची जागा गावठी कट्टा, पिस्तुलने घेतली आहे. किरकोळ वादातून बंदूक रोखण्याच्या किंवा गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये जिह्यात किरकोळ वादातून तीन वेळा बंदूक उगारण्यात आली आहे, तर दोन वेळा गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत.
तलवार, चाकू, सत्तूर आणि फायटरचा वापर काळाच्या ओघात मागे पडला. आता भागात दहशत माजवण्यासाठी सर्रास बंदुकी, छोट्या पिस्तुलचा वापर केला जात आहे. गेल्या वर्षभरात पोलिसांनी बंदुका, पिस्तुलशी निगडीत केलेल्या कारवायामधून ही बाब स्पष्ट झाली आहे. गेल्या 8 महिन्यांत 10 पिस्तूल, 3 रिव्हॉल्वर, 2 बंदूक जप्त केल्या आहेत.
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत, शहरात महापालिका निवडणूक होत आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सध्या शाळा, महाविद्यालयेही सुरू झाली आहेत. त्यातूनच कॉलेज वॉरही वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेकडून अवैध बंदुका, पिस्तुल, अन्य शस्त्रांचा शोध घेण्यासाठी मोठया प्रमाणात मोहीम राबवली जात आहे.
किरकोळ कारणावरुन बंदूक रोखण्याच्या घटनांमध्येही सध्या वाढ झाली असून, याला पायबंद घालणे गरजेचे आहे. मध्यप्रदेश, उत्तर प्रदेशमार्गे ट्रकमधून कोल्हापुरात कोल्हापूरसह इचलकरंजी परिसरात यापूर्वी शस्त्र तस्करीच्या उलाढाली होत होत्या, आता तस्करीचे जाळे ग्रामीण भागापर्यंत पोहोचले आहे. अनेक शस्त्र तस्करीच्या गुह्यांमध्ये तरुण अडकले आहेत.
जिह्यातील काही तस्करांचे थेट कनेक्शन मध्यप्रदेश, बिहारसह राजस्थान राज्यात असल्याचे समोर आले आहे. पिस्तुल, रिव्हॉल्वर, बंदुकीची तस्करी ट्रक, मालवाहतूक गाड्यांमधून होते. काही वेळा शस्त्रतस्कर स्वत: दुचाकीवऊन त्याची तस्करी करतात. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थानातून बांधकाम व्यवसायासाठी येणारे कामगारही या शस्त्र तस्करीच्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी 8 महिन्यांत 15 पिस्तुल, बंदूक जप्त केली. एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रs शहरात कोणासाठी आणली होती. याचे खरेदीदार कोण, याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. तसेच याचा वापर कशासाठी करण्यात येणार होता हे शोधणे गरजेचे आहे. पिस्तुल जप्त, परवाना रद्द गोळीबार किंवा पिस्तुल बाहेर काढल्याच्या घटनांमध्ये पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात येतो.
यानंतर हे पिस्तुल जप्त करण्यात येते. याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविण्यात येतो. यानंतर ज्या विभागाच्या वतीने शस्त्र परवाना मंजूर करण्यात आला आहे. तो विभाग संबंधित हा शस्त्र परवाना रद्द करु शकतो.
परवानाधारकांनी खुलासा देणे आवश्यक
"किरकोळ वादातून सध्या गोळीबाराच्या घटना घडत आहेत. परवानाधारकांकडूनच अशा प्रकारच्या घटना घडत असल्यामुळे पोलीस प्रशासनाच्या वतीने जिल्हाधीकारी कार्यालयासोबत पत्रव्यवहार करुन, प्रत्येक परवानाधारकास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. या नोटीसीमधून शस्त्र वापरण्याची का गरज आहे याचा खुलासा परवानाधारकांनी देणे आवश्यक आहे."
- डॉ. धीरजकुमार बच्चू, अपर पोलीस अधीक्षक
2025 मधील गोळीबाराच्या प्रमुख घटना
► बिद्री येथे स्क्रॅप व्यवसायातील वर्चस्ववादातून गोळीबार
► तरुणीवर इंम्प्रेशन मारण्यासाठी आर. के. नगर येथे तरुणाने रोखली बंदूक
► गणेशोत्सवात मंडळाच्या वादातून बारा बोअरची बंदूक रोखली
► दारु पिताना झालेल्या वादातून हवेत गोळीबार
► कोडोली (ता. पन्हाळा) येथे गोळीबार