महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वादामागून वाद

06:38 AM Jan 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

महाराष्ट्रात राजकारणाच्या चिंध्या झाल्या आहेत. कुणीही काहीही बोलते त्यावर क्रिया प्रतिक्रिया उमटतात आणि सबसे तेज सबसे पहिले म्हणत त्या ब्रेकींग, महाब्रेकींग असे सांगत दर्शकांच्या माथी मारल्या जातात. कालचा दिवस बरा, असे म्हणायची रोज वेळ येते आहे. राजकारण्यांच्या या चिखलफेकीत महापुरूषांना, देवदेवतांना आणि दिवंगतांनाही सोडले जात नाही. या साऱ्या धुळवडीत कौटुंबिक नाती, ज्येष्ठता, सभ्यता, औचित्य यांचेही भान ठेवले जात नाही, हे प्रगल्भ लोकशाहीचे आणि जाणत्या नेतृत्वाचे लक्षण नव्हे. राजकारणी कमी म्हणून त्यात आता पत्रकार सरसावले आहेत. सांगलीत महापालिकेने आयोजित केलेल्या एका सरकारी समारंभात एका ज्येष्ठ पत्रकाराने केंद्रातले व राज्यातील सरकार घालवल्याशिवाय मरणार नाही, अशी वक्तव्ये करून ‘हम भी कुछ कम नही’, असे दाखवून दिले. सभापती राहुल नार्वेकर यांच्या निकालानंतर पात्र, अपात्र वाद संपेल व शेवटचे काही महिने तरी सर्व 288 आमदार महाराष्ट्र विकासाच्या दृष्टीने काही करतील, अशी अपेक्षा होती, आहे पण, रोज कालचा दिवस बरा, अशी धुळवड सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि गुजरात लॉबिने लोकसभा निवडणुकीचा रोडमॅप तयार केला आहे.  इंडिया आघाडीचेही मोठे मनसुबे आहेत. एकास एक व जागा वाटप यासाठी त्यांच्या उठाबशा सुरू आहेत. भाजपने केलेल्या रोडमॅपमधील पहिला टप्पा म्हणजे सर्व्हे यामध्ये भाजपला 160 जागांवर लढत द्यावी लागेल. 100 जागांवर विजयाची आशा नाही व उर्वरीत जागा भाजपा जिंकेल, असा निष्कर्ष आला आहे. हे निष्कर्ष टप्प्या-टप्प्याने बदलत रहातात आणि भारतीय मतदार नेता पावसात भिजला म्हणूनही त्यास मतदान करतात. लोकसभा निवडणुकीसाठी लढत दुरंगी, तिरंगी का बहुरंगी यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. 2019 च्या निवडणुकीत भाजपाला सर्जिकल स्ट्राईकचा लाभ झाला होता. भाजपाला समर्थन देणारे मतदार आजही एकूण मतदारांच्या 50 टक्के नाहीत. सुमारे अठरा ते वीस टक्के मतदार वाढले तर भाजपा शतप्रतिशत यशस्वी होईल. पण, तूर्त ती शक्यता नाही. या पार्श्वभूमिवर भाजपा व संघ परिवाराने हिंदू मताचे एकत्रिकरण हा उद्देश ठेवलेला दिसतो. 22 जानेवारी ते 22 फेब्रुवारी या महिन्याभरात यावर मोठे काम केले जाणार आहे. त्यासाठी देशभर घरोघरी, अक्षता वाटल्या जात आहेत. आणि अयोध्येत राममंदिराचे उद्घाटन आणि रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते आहे. काहींच्या मते या समारंभातून जी रामभक्तीची लाट येईल ती सुनामी असेल. त्यात अनेक पक्ष संघटना नामोहरम होतील व हिंदू व्होट बँक मजबूत होईल. 22 जानेवारीनंतर महिन्याभरात आणखी दोन महत्वाचे निर्णय होतील. त्यामध्ये टप्प्या-टप्प्याने देशभर समान नागरी कायदा केला जाईल आणि उत्तर प्रदेशमध्ये सर्वात प्रथम व तातडीने त्याची अंमलबजावणी केली जाईल. त्याच जोडीला नागरिकत्व दुरूस्ती कायदा लागू केला जाईल. या तीन महत्त्वाच्या निर्णयामुळे देशात हिंदू मताचे एकत्रिकरण होईल आणि ‘अब की बार चारशे पार’ हा भाजपाचा नारा साकारण्यासाठी वातावरण होईल. भाजपाच्या पातळीवर त्यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. उमेदवार निश्चिती, बूथ निहाय नियोजन व योजना, मेगाभरती, विरोधकांच्या भानगडीवर कारवाई, असे अनेक प्लॅन तयार असल्याचे सांगितले जाते आणि देशभर जय श्रीरामचा नारा बुलंद होतो आहे. खरे तर राम हा सर्वांचा आहे. देवळात आणि शाळांतून अर्थात शिक्षण व धर्म यात राजकारण असता कामा नये. पण, शिवसेना उबाठा गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या विषयात रोज चिखलफेक करून ‘हात’ घाण करत असतो. लोकसभेच्या दृष्टीने महाराष्ट्रातील 48 खासदारकीच्या जागा महत्वाच्या आहेत. राज्यात राजकीय पक्षाचे सहा तुकडे दिसत आहेत. त्याच जोडीला मराठा मतदार, ओबीसी मतदार आणि मागासवर्गीय मतदार अशीही विभागणी दिसते आहे. जरांगे पाटील यांची मराठ्यांना आरक्षण व नातेवाईक सगे-सोयरे यांनाही ओबीसी दाखले यासाठी टोकाचा संघर्ष आहे. 20 तारखेला चलो मुंबई अशी तीन कोटी मराठ्यांना त्यांनी हाक दिली आहे. ओबीसी संघटनाही आक्रमक पवित्र्यात आहेत आणि दलित समाजातील मतदारही व्दिधा मन:स्थितीत दिसत आहेत. रामदास आठवले यांनी बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकरांना महायुतीत या मंत्रीपद व अकोला जागा देवू ,असे म्हटले आहे. शिवसेना उबाठा गटाने प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत निवडणूक मैत्री केली आहे व आंबेडकर यांना इंडिया आघाडीत घ्या, अशी मागणी केली आहे. आपल्याकडे बारा ते पंधरा टक्के मतदार आहेत, असे आंबेडकर यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हे मतदार सत्तेचे भविष्य लिहिणार हे ओघाने आले. राहूल गांधींनी प्रकाश आंबेडकरांना पदयात्रेसाठी निमंत्रण दिले आहे. पण, प्रथम इंडिया आघाडीत व मग, पदयात्रा, असे आंबेडकरांनी म्हटले आहे. आगामी 30 दिवस अनेक अर्थानी महत्वपूर्ण ठरणारे आहेत. पण, तूर्त वाद आणि वादातून वाद व चिखलफेक सुरू आहे. या धुळवडीतून कुणालाही कसलाही लाभ नाही. शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या विधानाने आणि त्यांनीच श्रीराम मांसाहारी होता वगैरे उधळलेली मुक्ताफळे यामुळे नवे वाद उत्पन्न झाले नसते तरच नवल. या आणि अशा विधानातून ते कुणाचे काम करीत आहेत, असा प्रश्न निर्माण झाला तर आश्चर्य नको. मी मुर्खांना उत्तर देत नाही, वगैरे स्टेटमेंट त्याच तोडीची आहेत. या शाब्दीक वादाबरोबरच न्यायालयीन वादही रंगले आहेत. विधान परिषदेचे सभापती राहूल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या सर्व आमदारांना पात्र ठरवून जे निकालपत्र दिले, कॉमेंट केल्या त्यावरूनही आता नव्याने कोर्टबाजी व चिखलफेक सुरू आहे. पुन्हा सर्वोच्च न्यायालय, पुन्हा याचिका, पुन्हा चिखलफेक वादातून नवे वाद आणि एकमेकांना शेलकी दुषणे, यामुळे महाराष्ट्राची, महाराष्ट्रातील राजकारणाची पिछेहाट होत आहे. सर्वच राजकीय नेते व घटनात्मक पदे, पदाधिकारी यांच्याबद्दल सामान्यांच्या मनात घृणा निर्माण होते आहे. पण, कुणालाच कशाशी देणे-घेणे नाही. राजकारण करणे आणि धनदांडगे होणे हाच कार्यक्रम आहे. आगामी 30 दिवस महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. जय श्रीरामचा नारा वाढतो आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article