अर्जेंटिना फुटबॉल संघाची केरळ भेट पुढील वर्षी
वृत्तसंस्था / मल्लापूरम (केरळ)
आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू लायोनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाचा फुटबॉल संघ 2026 च्या मार्च महिन्यात केरळच्या भेटीवर येणार असल्याची माहिती केरळचे क्रीडा मंत्री व्ही. अब्दुर रेहमान यांनी दिली आहे.
केरळ शासनाच्या 2031 स्पोर्ट्स व्हिजन कार्यक्रमा संदर्भात आयोजित केलेल्या समारंभात केरळच्या क्रीडा मंत्र्यांनी ही माहिती दिली आहे. अर्जेंटिनाच्या फुटबॉल संघाकडून केरळ शासनाकडे दोन दिवसांपूर्वीच ही माहिती देण्यात आली. अर्जेंटिनाचा फुटबॉल संघ हा जागतिक स्तरावरील अव्वल म्हणून ओळखला जातो. अर्जेंटिनाच्या फुटबॉल संघाच्या केरळ भेटी संदर्भात आतापासूनच केरळ शासनाकडून पूर्व तयारीच्या विविध कामांना प्रारंभ झाला आहे. कोचीतील जवाहरलाल नेहरु आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये अर्जेंटिना फुटबॉल संघाचे जोरदार स्वागत केले जाईल. या स्टेडियमध्ये अद्यावत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आतापासूनच विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. केरळ राज्यात फुटबॉल हा क्रीडा प्रकारात इतर क्रीडा प्रकारांच्या तुलनेने महत्त्वाचा समजला जातो. सध्या फुटबॉल आणि क्रिकेट या दोन क्रीडा प्रकारामध्ये केरळने मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करण्याचे ठरविले आहे, असेही केरळच्या क्रीडामंत्र्यांनी सांगितले. अर्जेंटिनाचा संघ केरळच्या भेटीमध्ये काही आंतरराष्ट्रीय मित्रत्वाचे सामने खेळणार आहे. दरम्यान कोचीमध्ये कोणताही सामना होणार नसल्याचे समजते.