टीजेएसबी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओपदी आरेकर
वृत्तसंस्था/ ठाणे
देशातील नागरी सहकारी बँकात आघाडीवर असणाऱ्या बहुराज्यीय टीजेएसबी सहकारी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी निखिल नंदकुमार आरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निखिल नंदकुमार आरेकर यांना एकतीस (31) वर्षाचा नागरी सहकारी बँकिंगचा प्रदीर्घ अनुभव आहे.
निखिल नंदकुमार आरेकर यांनी वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकर्स (IIBF) संस्थेकडून CAIIB ही पदवी घेतली आहे. बँकिंगमधील ब्रँच बँकिंग, रिटेल क्रेडिट, कॉर्पोरेट क्रेडिट, फॉरेक्स, एन.पी.ए. मॅनेजमेंट आणि बिझनेस डेव्हलपमेंट यातील तज्ञ अशी निखिल नंदकुमार आरेकर यांची ओळख आहे. डिसेंबर 1993 रोजी टीजेएसबी सहकारी बँक लि.च्या सेवेत रुजू झाले होते. बँकेत विविध पदांवर यशस्वीपणे काम करून बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या पदापर्यंत पोहोचले आहेत. शालेय शिक्षण बेडेकर विद्यामंदिर आणि वाणिज्य शाखेचे पदवी शिक्षण ठाणे कॉलेज येथून पूर्ण केले आहे. बँकिंग आणि अर्थकारणाचे अभ्यासक असलेले निखिल नंदकुमार आरेकर हे चांगले वाचक असून, साहित्य-संस्कृतीचे जाणकार आहेत.
व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निखिल नंदकुमार आरेकर आपल्या कारकिर्दीत टीजेएसबी सहकारी बँकेच्या कामकाजाची गती वाढवून ग्राहक सेवेची तत्परता आणि अचूकता अधिक प्रभावी करतील, असा विश्वास बँकेच्या संचालक मंडळाने व्यक्त केला आहे.
बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.सुब्बलक्ष्मी शिराली दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजी निवृत्त झाल्या. सुब्बलक्ष्मी शिराली यांनी नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल नंदकुमार आरेकर यांना शुभेच्छा दिल्या.