For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘खाकी’तील हेकेखोर की दरोडेखोर?

02:49 PM Feb 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘खाकी’तील हेकेखोर की दरोडेखोर
Advertisement

भ्रष्टाचारामुळे खात्याला बट्टा : अश्लील चाळे, सोने चोरीत सहभाग, पोलीस ठाणी बनलेत रियल इस्टेट चालकांचे अड्डे

Advertisement

रमेश हिरेमठ/बेळगाव

मुख्यमंत्री सिद्धरामय्या व गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांच्या विचारांना अभिप्रेत असलेला कारभार पोलीस दलात चालतो का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बेळगावात पोलीस ठाणे रियल इस्टेटचे अड्डे बनले आहेत. काही अधिकाऱ्यांची मनमानी वाढली आहे. शहर व उपनगरात मटका, जुगार व अमलीपदार्थांच्या व्यवसायाने उचल खाल्ली आहे. पोलीस केवळ गांजा सेवन करणाऱ्यांवर कारवाई करत सुटले आहेत. मोठ्या प्र्रमाणात अमली पदार्थांची विक्री करणारे मात्र मोकाट सुटले आहेत.

Advertisement

पंधरा दिवसांपूर्वी राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली. बेंगळूर येथे झालेल्या या बैठकीत पोलीस दलाच्या कार्यपद्धतीबद्दल मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नाराजी व्यक्त केली होती. खून, दरोडे, चोऱ्या आदींसारख्या गंभीर स्वरुपाच्या 80 हून अधिक गुन्ह्यात अधिकारी व पोलिसांना अटक झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वीची ही आकडेवारी आहे. त्यानंतर आणखी अनेक घटना घडल्या आहेत. बेळगाव उत्तर विभागाचे याआधीचे पोलीस महानिरीक्षक डॉ. रामचंद्रराव यांच्याविषयीचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बेळगाव व बेळगावात काम केलेल्या नंतर वादात सापडलेल्या अधिकाऱ्यांविषयी ठळक चर्चा सुरू झाली आहे.

खासगी वाहिन्यांनी डॉ. रामचंद्रराव यांचे काही व्हिडिओ प्रसारित केले. आपल्याच कार्यालयात गणवेशात बसून अश्लील चाळे करतानाचे त्यांचे ते व्हिडिओ आहेत. या प्रकारानंतर मुख्यमंत्री व गृहमंत्री अशा अधिकाऱ्यांवर पार भडकले आहेत. 17 जुलै 2016 पासून 31 डिसेंबर 2017 पर्यंत ते बेळगावात कार्यरत होते. बेळगावात असतानाचे हे व्हिडिओ असावेत, असा संशय आहे. राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. व्हिडिओतील महिला कोण? याचा शोध घेण्यात येत आहे.

डॉ. रामचंद्रराव यांचे कारनामे अनेक आहेत. महाराष्ट्र-कर्नाटकातील खतरनाक गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या धर्मराज चडचण एन्काऊंटर व त्याचा भाऊ गंगाधर चडचणच्या खून प्रकरणात केवळ डॉ. रामचंद्ररावच नव्हे तर आणखी काही पोलीस अधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप झाले होते. मोठी रक्कम घेऊन धर्मराजचा एन्काऊंटर करण्यात आला होता. तर धर्मराजच्या एन्काऊंटरनंतर तेथेच सापडलेल्या गंगाधरला उचलून अलगद त्यांचे प्रतिस्पर्धी महादेव सावकार भैरगोंड याच्याकडे सोपविण्यात आले होते. त्यानंतर गंगाधरची हत्या करून त्याच्या मृतदेहाचे तुकडे भीमा नदीत टाकण्यात आले होते. या प्रकरणात डॉ. रामचंद्रराव प्रमुख भूमिका वठवल्याचे उघडकीस आले होते.

राजधानी बेंगळूरपासून 500 किलोमीटर अंतरावर असलेल्या बेळगावकडे वरिष्ठांचे फारसे लक्ष नसते. याचा गैरफायदा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी कसे घेतात, हे अनेक प्रकरणांवरून उघडकीस आले आहे. जे कायद्याचे रक्षक आहेत तेच गुन्हेगारी टोळ्यांना मदत करून एन्काऊंटरची सुपारी घेतलेले आहेत. पोलीस निरीक्षक एम. बी. असोदे व पोलीस उपनिरीक्षक गोपाल हळ्ळूर यांच्यावर कारवाईही झाली आहे. केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्यास पोलीस दलाच्या इभ्रतीला धक्का बसू नये, यासाठी डॉ. रामचंद्रराव यांना मोठ्या प्रकरणात अडकल्यानंतरही मोकळे सोडण्यात आले होते.

डॉ. रामचंद्रराव यांची सावत्र मुलगी रन्या राव हिला सोने तस्करी प्रकरणात अटक झाली आहे. त्यावेळीही त्यांच्या नावाची ठळक चर्चा झाली. वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांना असलेली विशेष सुविधा ते आपल्या लेकीला सोने तस्करीसाठी उपलब्ध करून देत होते. यापूर्वी म्हैसूरमध्ये कार्यरत असताना एका दरोडे प्रकरणात त्यांचे नाव चर्चेत आले होते. त्यावेळच्या स्थानिक पोलीस अधिकाऱ्याला अटक झाली. या प्रकरणातूनही ते सहीसलामत सुटले.

आणखी एक आयपीएस अधिकारी राघवेंद्र सुहास हे बेळगावात उत्तर विभागाच्या पोलीस महानिरीक्षक पदावर कार्यरत असतानाही पोलीस दलाने शरमेने मान खाली घालावी, असा प्रकार घडला. 9 जानेवारी 2021 रोजी महाराष्ट्रातून केरळकडे जाणारी एक अर्टिगा कार हत्तरगी टोलनाक्यावर अडविण्यात आली. राघवेंद्र सुहास यांच्या सूचनेवरून ही कार अडवून यमकनमर्डी पोलीस स्थानकात आणण्यात आली. या कारमध्ये पावणेपाच किलो सोने होते. या सोन्याची चोरी झाली. तिलक पुजारी यांनी तक्रार केली. त्यावेळचे जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी व अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख अमरनाथ रेड्डी यांनी या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन पोलिसांचा सहभाग आढळून आल्याने हे प्रकरण सीआयडीकडे सोपविण्याची शिफारस केली होती.

सीआयडीने तपास हाती घेतल्यानंतर आयपीजी राघवेंद्र सुहास यांच्यासह चार पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या. या प्रकरणाआधी व नंतरही हत्तरगी टोलनाक्यापासून हिरेबागेवाडी टोलनाक्यापर्यंत अनेक वाहने अडवून सोने, रोकड लुटण्यात आली आहे. या प्रकरणातही पोलिसांनाच दरोडेखोर ठरवणारे पुरावे उघडकीस आले होते. बेळगावात अनेक आयपीएस अधिकाऱ्यांनी आपल्या लोकाभिमुख कार्याने वेगळा ठसा उमटवला आहे. मात्र, गुन्हेगारी कारवायांनी आयपीएस अधिकारी असे असू नयेत, असे कार्यही काही अधिकाऱ्यांनी केले आहे.

भ्रष्ट अधिकाऱ्यांना लगाम न घातल्यास परिस्थिती हाताबाहेर

सर्वसामान्य नागरिकांना खून प्रकरणात अडकवून आपली नोकरी टिकविण्याचे कामही एका आयपीएस अधिकाऱ्याने केले आहे. एका खून प्रकरणात तर खून कसा करावा, खुनानंतर पोलिसांना कसे चकवावे? याचे सल्लेही एका अधिकाऱ्याने दिले होते. आपल्यावर कोणाचेच लक्ष नाही, या थाटात मनमानी करणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्यांना काही वेळा बेळगावकरांनी तर काही वेळा निसर्गाने अद्दल घडवल्याची उदाहरणे आहेत. काही आडमुठ्या व हप्तेखोर अधिकाऱ्यांमुळे पोलीस दलाची प्रतिमा डागाळत चालली असून पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी वेळीच भ्रष्ट अधिकाऱ्यांना लगाम घातला नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याचाच धोका अधिक आहे.

हप्तेखोर अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे प्रकार

राज्य पोलीस महासंचालक डॉ. एम. ए. सलीम यांनी पोलीस अधिकाऱ्यांनी कसे वागावे व कसे वागू नये? यासंबंधी सविस्तर सूचना केल्या आहेत. आपल्या समस्या घेऊन पोलीस स्थानकात येणाऱ्या नागरिकांशी सौजन्याने वागावे, विनाविलंब त्यांच्या तक्रारी ऐकून एफआयआर दाखल करावे, या सूचनेचे बेळगाव शहर व जिल्ह्यात वारंवार उल्लंघन केले जात आहे. शहरातील अनेक पोलीस अधिकाऱ्यांना तर फोनची अॅलर्जी आहे. आम्ही किती जणांचे फोन उचलायचे? असे सांगत हात झटकण्याचे कर्तव्य ते पार पाडत आहेत. काही अधिकारी तर पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या नावावर जगत आहेत. पालकमंत्री कधीच कोणत्या अधिकाऱ्यांना असेच करा, असे सांगत नाहीत. प्रत्येकांना त्यांचा स्वभाव परिचित आहे. तरीही काही अधिकारी त्यांच्या नावाचा वापर करतच आहेत. यडा मार्टिन मार्बन्यांग पोलीस आयुक्त असताना मटका, जुगार थोपविण्यासाठी पालकमंत्र्यांनी कडक सूचना दिल्या होत्या. आता पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाली असून हप्तेखोर अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे प्रकार वाढल्यामुळे अधिकारी माजले आहेत.

Advertisement
Tags :

.