सापांची अंडी माणसांना चालतील?
पृथ्वीवर आता मानवांची संख्या अतिप्रचंड झाली आहे. आजमितीला 800 कोटींहून अधिक मानव पृथ्वीवर आहेत. इतक्या लोकांसाधी पुरेशा अन्नाची व्यवस्था करणे, हे भविष्यात जगासमोरचे सर्वात मोठे आव्हान असेल. त्यामुळे आजवर जे पदार्थ कधीही खाल्ले जात नव्हते, त्यांच्यासंबंधी नव्याने विचार केला जात आहे. त्यातच सापांची अंडी हा पदार्थ आहे. कोंबडी, बदक, शहामृग आदी पक्ष्यांची अंडी आज सर्रास खाल्ली जातात. कोंबडीचे अंडे तर जगप्रसिद्ध आहे.
तथापि, सापांची अंडी खाल्ली जाऊ शकतात का आणि तसे केल्यास मानवी शरीरावर त्याचे कोणते परिणाम होऊ शकतील, यावर संशोधक केले जात आहे. या संशोधनाचे आजवरचे निष्कर्ष फारसे समाधानकारक नाहीत. सापाची अंडी माणसांसाठी आहार म्हणून अनुकूल नाहीत, असा निष्कर्ष आतापर्यंतच्या संशोधनावरुन काढण्यात आला आहे. विज्ञानविषयक नियतकालिकांमधून अनेकदा सापांच्या अंड्यांच्या आहारमूल्यांविषयीची बरीच माहिती प्रसिद्ध केली जात आहे.
मध्यप्रदेशातील एक तज्ञ महादेव पटेल यांनी सापांची अंडी मानवासाठी हानीकारक असल्याचे मत नोंदविले आहे. अनेक सापांच्या अंड्यांच्या बलकात विषारी जंतू किंवा जीवाणू असण्याची शक्यता असते. त्यामुळे ती मानवाच्या खाण्यासाठी उपयुक्त नाहीत. सापांच्या अंड्यांमध्ये परोपजीवी जंतूही (पॅरेसाईट्स्) असू शकतात, ज्यांच्यामुळे मानवाला विषबाधा होऊ शकते, किंवा इतर अनेक घातक विकार होऊ शकतात. विशेषत: साल्मोनेला हा जीवाणू मानवासाठी अधिक घातक असू शकतो. त्यामुळे सापांची अंडी खाणे टाळावे, असे तज्ञांचे मत आहे. हा प्रश्न भारतात फारसा महत्वाचा नाही. कारण भारतात हिंदू समाजात सर्पांना धार्मिक महत्व असल्याने त्यांची पूजा केली जाते. त्यामुळे त्यांना किंवा त्यांच्या अंड्यांना खाल्ले जात नाही. पण अन्य देशांमध्ये हा प्रश्न विचाराधीन राहिला आहे.