भाजप नेते हायकमांड आहेत का?
मुख्यमंत्री बदलावरून सिद्धरामय्यांचा विरोधी पक्षाला सवाल
प्रतिनिधी/ बेळगाव
कर्नाटकात मुख्यमंत्री कोण असावा? हा काँग्रेसचा अंतर्गत मुद्दा आहे. यामध्ये भाजपने लक्ष घालण्याची गरज नाही. काँग्रेसमध्ये काय चालले आहे? याचा विचार करण्यासाठी भाजप नेते आमचे हायकमांड आहेत का? असा प्रश्न मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी उपस्थित केला.
शनिवारी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी विशेष विमानाने मुख्यमंत्र्यांचे बेळगावात आगमन झाले. यावेळी विमानतळावर पत्रकारांशी बोलताना सिद्धरामय्या यांनी भाजप नेत्यांवर टीका केली. एनडीआरएफ अनुदानाचा वापर गॅरंटी योजनांसाठी केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी केला आहे. ही गोष्ट चुकीची आहे.
गॅरंटी योजनांमुळे सर्वत्र आपल्या सरकारचे कौतुक होत आहे. त्यामुळेच भाजप नेते हबकले आहेत. दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करून आम्ही गॅरंटी योजना अंमलात आणल्या आहेत. एनडीआरएफ अनुदानाचा वापर या योजनांसाठी केला जात नाही. कर्नाटकात आम्ही ज्या योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत, त्या बिहार, नवी दिल्ली, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, हरियाणामध्येही अंमलात आणण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गॅरंटी योजनांची अंमलबजावणी शक्य नाही, असे म्हटले होते. पण आम्ही बोलल्याप्रमाणे चाललो आहोत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात 2017 मध्ये सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणीच्या कामाला आपणच चालना दिली होती. आता त्याचे उद्घाटनही आपल्या हस्ते झाले आहे, याचा आपल्याला आनंद होतो आहे. भाजपच्या राजवटीत कामे झाली नाहीत. इस्पितळाची देखभाल खासगींना दिली नाही, असे स्पष्ट करतानाच काँग्रेसमध्ये ज्या घडामोडी सुरू आहेत, त्याचा विचार भाजपने करण्याची गरज नाही, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी भाजप नेत्यांना दिला.