For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताचा कंपाऊंड महिला संघ अंतिम

06:22 AM May 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारताचा कंपाऊंड महिला संघ अंतिम
Advertisement

विश्वचषक तिरंदाजी स्पर्धा स्टेज 2 : पुरुष संघाचे कांस्यपदक हुकले

Advertisement

वृत्तसंस्था/ येचेऑन, द.कोरिया

जागतिक अग्रमानांकित भारताच्या कंपाऊंड महिला तिरंदाजी संघाने येथे सुरू असलेल्या तिरंदाजी वर्ल्ड कप स्टेज 2 मध्ये अंतिम फेरी गाठली. पण पुरुष संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत पराभव स्वीकारावा लागल्याने त्यांना या स्पर्धेतून रिकाम्या हाताने परतावे लागणार आहे.

Advertisement

ज्योती सुरेखा वेन्नम, परनीत कौर, अदिती स्वामी या त्रिकुटाने वर्ल्ड कप स्टेज 1 मध्ये सुवर्णपदक पटकावले होते. त्यांनी येथे उपांत्य फेरीत अमेरिकन तिरंदाजांचा 233-229 अशा गुणांनी पराभव करून अंतिम फेरी गाठली. जागतिक सातव्या मानांकित तुर्कीविरुद्ध भारताची शनिवारी सुवर्णपदकासाठी लढत होणार आहे. तुर्कीच्या महिला तिरंदाजांनी अग्रमानांकित व स्थानिक फेव्हरिट दक्षिण कोरियन तिरंदाजांना 234-233 असा धक्का देत अंतिम फेरीत स्थान मिळविले. भारताच्या महिला स्पर्धकांसाठी ही स्पर्धा सोपी गेली. पात्रता फेरीत दुसरे स्थान मिळविल्यानंतर उपांत्यपूर्व फेरीसाठी त्यांना बाय मिळाला होता. उपांत्यपूर्व फेरीत भारतीयांनी इटलीच्या तिरंदाजांवर 236-234 अशी मात केली होती.

प्रियांश, प्रथमेश फुगे, अनुभवी अभिषेक वर्मा या जागतिक अग्रमानांकित भारतीय त्रिकुटाला बरेचसे खालचे मानांकन असलेल्या ऑस्ट्रेलियाकडून कांस्यपदकाच्या लढतीत 233-233 (10-10ङ) शूटऑफमध्ये पराभव स्वीकारावा लागला. पात्रता फेरीत भारतीय संघाला चौथे स्थान मिळाले होते तर ऑस्ट्रेलियन संघ जागतिक क्रमवारीत 21 व्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियन संघाने 59 गुणांनी सुरुवात करीत भारतीयांना चकित केले. ऑस्ट्रेलिया संघात बेली विल्डमन, ब्रँडन हॉवेस, जोनाथन मिल्ने यांचा समावेश असून त्यांनी दुसऱ्या फेरीअखेर एका गुणाची पिछाडी भरून काढत 233-233 अशी बरोबरी साधली. नंतर शूटऑफमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी 30 गुण मिळविले. पण ऑसी संघाने दोनदा मध्याच्या जवळ तीर मारत भारतीयांना मागे टाकून कांस्यपदक निश्चित केले. भारताने पहिल्या लढतीत व्हिएतनामचा 235-212 असा सहज पराभव केल्यानंतर डेन्मार्क व अग्रमानांकित अमेरिकेचे कडवे आव्हान शूटऑफमध्ये मोडून काढत आगेकूच केली होती.

दरम्यान, अनुभवी तरुणदीप राय व दीपिका कुमारी यांनी रिकर्व्ह विभागाच्या पात्रता फेरीत अनुक्रमे चौथे व सहावे स्थान मिळविले. तरुणदीपने 681 गुण नोंदवले तर धीरज बोम्मदेवराचे टॉप टेनमधील स्थान थोडक्यात हुकले. पाच तिरंदाजांचे समान 678 गुण झाले होते. पण सेंटरच्या नजीक ज्यांनी जास्त तीर मारले त्यात धीरज कमी पडल्याने त्याला 11 वे स्थान मिळाले. तरुणदीप व धीरज यांनी आपल्या कामगिरीने भारताचे दुसरे मानांकन निश्चित केले. भारत व अग्रमानांकित दक्षिण कोरिया यांची मोहीम सुरू होईल तेव्हा ते विरुद्ध ड्रॉमध्ये असतील. मात्र अंतिम फेरीत त्यांची गाठ पडू शकेल. गेल्या महिन्यात शांघाय येथे झालेल्या पहिल्या टप्प्यात भारताने कोरियाला धक्का देत सुवर्ण मिळविले होते.

Advertisement

.