विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेला आज प्रारंभ
भारतीय संघाचे नवा प्रशिक्षक डेव्ह कझीन्स यांची सत्त्वपरीक्षा
वृत्तसंस्था, माद्रिद
आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दृष्टिकोनातून आतापासूनच पूर्वतयारीवर अधिक भर देत असलेल्या भारतीय तिरंदाजपटूंना नवा प्रशिक्षक लाभलेल्या डेव्ह कझीन्सच्या कामगिरीची सत्त्वपरीक्षा ठरणार आहे. येथे मंगळवारपासून विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेतील चौथ्या आणि शेवटच्या टप्प्याला प्रारंभ होत आहे.
आगामी आशियाई स्पर्धा जपानमध्ये 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान खेळविली जाणार आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेपूर्वी भारतीय तिरंदाजपटूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करण्याची ही या स्पर्धेतील शेवटची संधी राहील. भारताच्या तिरंदाजपटूंना कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात दर्जेदार कामगिरीसाठी अधिक परिश्रम घ्यावे लागतील तसेच त्यांना आता नवा प्रशिक्षक लाभला आहे. भारताच्या रिकर्व्ह तिरंदाजी संघाला त्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे राहील. यापूर्वी भारतीय तिरंदाजी संघाला इटलीच्या सर्जिओ पागनी यांचे मार्गदर्शन लाभले होते. त्यांच्या प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीत भारतीय तिरंदाजपटूंनी कंपाऊंड प्रकारात 5 सुवर्णपदके तसेच 1 रौप्य आणि 1 कांस्यपदक मिळविले होते. पागनी यांचा करार संपुष्टात आल्याने त्यांच्या जागी कझीन्स यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
चालु वर्षीच्या तिरंदाजी हंगामातील पहिल्या तीन विश्वचषक तिरंदाजी स्पर्धांमध्ये भारताला केवळ 1 सुवर्ण आणि 1 कांस्यपदक मिळविले आहे. गेल्या महिन्यात झालेल्या अॅन्टेलिया येथील स्पर्धेत भारताच्या तिरंदाजपटूंना कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात एकही पदक मिळविता आले नव्हते. आतापर्यंत विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेतील चार टप्प्यामध्ये भारताने 7 सुवर्ण, 1 रौप्य आणि 4 कांस्यपदके मिळविली आहेत.