नागपूर येथे युवा संघर्ष यात्रेत अर्चना- घारे परब सहभागी
सावंतवाडी | प्रतिनिधी
आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात सुरु झालेली युवा संघर्ष यात्रेची नागपूर येथे सांगता झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार ,मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग, शिवसेना नेते संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथे सांगता सभा संपन्न झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकणातील प्रतिनिधी म्हणून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभाग अध्यक्ष सौ. अर्चना घारे परब या सभेस उपस्थित होत्या.
राज्याने कंत्राटी नोकरभरतीचे धोरण रद्द करणे, रिक्त पदांची भरती करणे अवाजवी परीक्षा शुल्कातून होत असलेली तरुणांची लूट थांबवणे, शिक्षक व प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरणे तसेच राज्यातील औद्योगिक विकास, कृषी ,क्रीडा, कायदा व सुव्यवस्था यांबाबत अनेक मागण्या घेऊन या यात्रेने तब्बल ८०० किलोमीटरचे अंतर पायी कापले.
"राज्यातील तरुणाईला सरकारने बेरोजगारीच्या डोहात ढकलले, शासकीय भरती होत नाही, भरती झालीच तर लवकर परीक्षा होत नाही, परीक्षा झालीच तर पेपर परस्पर फुटतो, पेपर फुटला नाही तर निकालच लागत नाही, निकाल लागलाच तर लवकर पदनियुक्ती मिळत नाही. एक नव्हे तर अनेक संकटांनी या तरुणाईला घेरलं असताना सरकार मात्र केवळ बेरजेच्या राजकारणात व्यस्त आहे. तरुणाईच्या या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सभेस उपस्थित राहून युवकांच्या या लढ्यात सहभागी झाले." अशी भावना सौ. अर्चना घारे परब यांनी व्यक्त केली.
या यात्रेला तसेच सांगता सभेला लाभलेला प्रतिसाद बघता राज्यातील तरुणाई राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी असून येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा युवकांच्या संघर्षाला आवाज देणारा पक्ष ठरेल असा विश्वास सौ. अर्चना घारे परब यांनी व्यक्त केला. या सभेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, खासदार अमोल कोल्हे, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.