राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत आरवलीच्या संस्कृती मोरजकरचे सुयश
कुमिते प्रकारात सुवर्णपदक तर काता प्रकारात कांस्यपदकाची ठरली मानकरी
भरत सातोस्कर/ वेंगुर्ले
विरार मुंबई येथे नुकत्याच झालेल्या STAIRS STATE YOUTII GAMES Western Maharashtra Karate Championship २०२५-२६ या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरवली-सखैलेखोलची सुकन्या संस्कृती संजय मोरजकर हिने जिद्द व चिकाटीच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी बजावत कुमिते प्रकारात सुवर्णपदक तर काता प्रकारात कांस्यपदक अशी दोन पदके पटकाविली. तिची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मुंबई-विरार, ग्रीन पॅलेस रिसॉर्ट, अर्नाळा बीच येथे ही स्पर्धा दि. ३ व ४ जानेवारी रोजी पार पडली. संस्कृती मोरजकर हिने १५ वर्षे खालील वयोगटात ३५ किलो वजनी गटात राज्यातील विविध जिल्हयांतील खेळाडूंमध्ये तीव्र स्पर्धा होत असताना सिंधुदुर्ग मधील आरवली-सखैलेखोल च्या कन्या संस्कृती मोरजकर हिने कौशल्य व चिकाटी च्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी बजावत कुमिते प्रकारात सुवर्णपदक मिळवून राज्यस्तरावर आपले वर्चस्व सिद्ध केले. तसेच काता प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करीत ब्राँझ पदक मिळवले. तिच्या या नेत्रदिपक यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व क्षेत्रात तसेच आरवली-सखैलेखोल गावात तिचे खास अभिनंदन होत आहे. संस्कृती मोरजकर हिला तिचे प्रशिक्षक किरण देसाई यांचे अचूक व मोलाचे मार्गदर्शन लाभले. सखैलेखोल गावाचे पोलीस पाटील संजय उर्फ सनी मोरजकर यांची ती मुलगी आहे. या स्पर्धेतील उज्वल कामगिरीमुळे संस्कृती मोरजकर हिची राष्ट्रीय स्तरावरील दिल्ली येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.संस्कृती मोरजकर हिच्या या यशाबद्दल प्रशिक्षक, पालक, शैक्षणिक संस्था तसेच ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यापुढील स्पर्धांतही ती आणखी मोठे यश संपादन करील अशा शुभेच्छा तिला दिल्या जात आहेत.