बाजारामूल्यात ‘ऍपल’ला मागे टाकत ‘अराम्को’ ठरली अव्वल
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
मागील काही वर्षांपासून बाजारमूल्यात जगात अव्वल स्थान राखणाऱया कंपन्यांमध्ये ऍपल सर्वोच्च स्थानी होती, परंतु मागील काही दिवसांपासून जागतिक पातळीवरील आर्थिक घडामोडींसोबत अन्य उद्योग क्षेत्रात अनेक बदल होत असल्याचे दिसून येत आहे. याचाच एक भाग म्हणजे ऍपल कंपनीला पाठीमागे टाकत सौदीची अराम्को बाजारमूल्यात अव्वल कंपनी बनली आहे.
कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये आलेली तेजी व याच बदलाचा अधिकचा लाभ अराम्कोचा समभाग मजबूत होण्यास कारणीभूत ठरला आहे. दुसरी बाब म्हणजे महागाईच्या कारणास्तव शेअर बाजारात तंत्रज्ञान क्षेत्रातील समभाग प्रभावीत होत बंद झाले आहेत. सौदी अरेबियन नॅशनल पेट्रोलियम ऍण्ड नॅचरल गॅस कंपनी जगातील सर्वात मोठी तेल उत्पादक कंपनी आहे.
बाजारमूल्यामधील चढाओढ
समभागातील किमतीच्या आधारे सौदी अराम्कोचे बाजारमूल्य 2.42 ट्रिलियन डॉलर्सवर राहिले आहे. याच्या व्यतिरिक्त ऍपलच्या समभागाची किमतही मागील एक महिन्यामध्ये घसरणीतच राहिली आहे. याच कारणास्तव बुधवारी कंपनीचे बाजारमूल्य 2.37 ट्रिलियनवर राहिले आहे. चालू वर्षातील पहिल्या तिमाहीत मजबूत ग्राहकांच्या मागणीच्या मदतीने ऍपलने अपेक्षेपेक्षा अधिक नफा कमाई केली असूनही कंपनीच्या समभागांच्या किमतीत मात्र घसरण राहिली आहे. यामध्ये अराम्कोचा निव्वळ नफा हा 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये 124 टक्क्यांनी वधारुन 110.0 अब्ज डॉलर्सच्या घरात पोहोचला आहे.