For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आराधना मिश्रा आता युपी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा

06:03 AM Oct 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
आराधना मिश्रा आता  युपी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा
Advertisement

इम्रान मसूद यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपद

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

2027 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने आपल्या संघटनेत मोठे बदल केले आहेत. पक्षाने ज्येष्ठ नेते प्रमोद तिवारी यांची कन्या आणि तीनवेळा आमदार राहिलेल्या आराधना मिश्रा-मोना यांची उत्तर प्रदेश काँग्रेस समितीच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्या अजय राय यांची जागा घेतील. सहारनपूरचे खासदार आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील एक प्रमुख मुस्लीम नेते इम्रान मसूद यांची राज्य काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पक्षाने देवेंद्र निषाद आणि आलोक प्रसाद यांची वरिष्ठ उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. चौधरी वीरेंद्र सिंह यांची उत्तर प्रदेश विधानसभेतील काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Advertisement

राज्यातील पक्षाच्या नव्या नेतृत्वात ब्राह्मण, मुस्लीम, ओबीसी आणि दलित नेत्यांचा समावेश करून, पक्षाने उत्तर प्रदेशातील संघटनेची पुनर्रचना करण्याचे संकेत दिले आहेत. 2027 च्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या संघटनात्मक रणनीतीमधील एक बदल म्हणून या नियुक्त्यांकडे पाहिले जात आहे. राज्यात आपला पाठिंबा वाढवणे आणि विविध सामाजिक व प्रादेशिक गटांमध्ये आपले राजकीय अस्तित्व मजबूत करणे, हे पक्षाचे उद्दिष्ट आहे.

आराधना मिश्रा-मोना या उत्तर प्रदेशच्या राजकारणातील काँग्रेसचा एक सुप्रसिद्ध चेहरा आहे. त्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार प्रमोद तिवारी यांच्या कन्या आहेत. त्यांची राजकीय ओळख प्रतापगड जिह्यातील रामपूर खास विधानसभा मतदारसंघाशी जोडलेली आहे. 52 वर्षीय आराधना मिश्रा या मतदारसंघातून तीनवेळा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष होण्यापूर्वी त्या उत्तर प्रदेश विधानसभेत काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेत्या होत्या. आराधना यांचे कुटुंब अनेक दशकांपासून रामपूर खासच्या राजकारणात सक्रिय आहे.

इम्रान मसूद यांची पश्चिम उत्तरप्रदेशवर पकड

काँग्रेसने सहारनपूरचे खासदार इम्रान मसूद यांची उत्तर प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. पश्चिम उत्तर प्रदेशात त्यांचा राजकीय आधार असून ते काँग्रेसच्या प्रमुख मुस्लीम नेत्यांपैकी एक आहेत. आराधना मिश्रा यांची प्रदेशाध्यक्ष आणि इम्रान मसूद यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा निर्णय, पूर्व आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये प्रादेशिक संतुलन साधण्याचा काँग्रेस नेतृत्वाचा प्रयत्न दर्शवतो. 2027 च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील सर्व प्रमुख राजकीय पक्ष आपला सामाजिक पाठिंबा मजबूत करण्याचा प्रयत्न करत असतानाच इम्रान मसूद यांची नियुक्ती झाली आहे.

Advertisement
Tags :

.