For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एप्रिल फूल

06:38 AM Apr 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
एप्रिल फूल
Advertisement

एप्रिल फूल डे, बहुतेक देशांमध्ये एप्रिलचा पहिला दिवस हा एप्रिल फूल दिवस मानला जातो. या दिवशी आपल्या नातेवाईक, मित्र-मैत्रिणीबरोबर हास्य-विनोद करत एकमेकांची गंमतीने फसवणूक करणे आणि फसवल्याचा आनंद घेणे यात लोक धन्यता मानतात. पण किती जणांना माहित आहे की आपण फक्त एप्रिल एक तारखेलाच नाही तर आपले संपूर्ण आयुष्यच फसले गेलेलो आहोत. फसणे याचा अर्थ जे नाही त्याला आहे समजणे. आपण सर्वानी ‘मृगजळ’  पाहिले आहे जे पाण्यासारखे भासते पण जवळ गेल्यावर कळते तेथे पाणी नाहीच आहे. तद्वत या जगामध्ये सुख असल्याचा भास होतो पण वास्तविक पाहावयास गेलो तर ज्या सुखाच्या शोधात आपण असतो ते आपल्यापासून दूर दूर जात राहते. आणि जे कांही प्राप्त होते ते दु:खाला कारणीभूत ठरणारे आमिष असते. ज्याप्रमाणे मासे पकडण्यासाठी कोळी नदीमध्ये अथवा समुद्रामध्ये जेव्हा गळ टाकतो तेव्हा गळाच्या अणुकुचीदार टोकाला एखादे आमिष म्हणून जिवंत कीडा अथवा मांसाचा तुकडा लावतात. जेव्हा मासा त्या गळाकडे पाहतो तेव्हा त्याला केवळ मांसाचा तुकडा दिसतो पण आतील त्याचा जीव घेणारा अणुकुचीदार हुक दिसत नाही. पण जेव्हा मासा त्या गळाला पकडतो आणि अडकतो त्यावेळी कदाचित कोळी म्हणत असेल ‘एप्रिल फूल’. अगदी अशीच अवस्था या जगातील प्रत्येक जीवाची आहे. आपणाला एखादी वस्तू दिसते आणि ती हवीहवीशी वाटते पण त्यापाठीमागील बंधन आपल्याला कळत नाही.

Advertisement

संत तुकाराम महाराज आपल्याला अशीच कांही उदाहरणे देऊन आपला जीवनाचा ‘एप्रिल फूल’ कसा झाला आहे हे समजून देतात. ते म्हणतात आपुल्याचा भोत चाटी । मारी करंटीं पारिख्या ।।1।। ऐसें जन भुललें देवा । मिथ्या हेवा वाढवी ।।ध्रु.।। गळ गिळी आमिशे मासा । प्राण आशा घेतला ।।2।। तुका म्हणे बोकड मोहो । धरी पहा हो खाटिकाचा ।।3।। अर्थात “गाईचे मेलेले वासऊ असते मग त्याच्यात भुसा भरला जातो आणि त्याचे भोत तयार केले जाते व तेच भोत गाई पुढे उभे केले जाते व ती गाय त्या भोताला चाटते व पान्हा सोडते परंतु जर त्याच गाईजवळ दुसऱ्या गाईचे वासरू आणले तर ती गाय त्या वासराला मारत असते त्याप्रमाणे हे देवा हे सर्व लोक मीथ्या विषयांचा हेवा वाढवून त्यालाच भुलले आहेत. गळाला आळी लावतात व त्याच्या आमिषापोटी मासा गळाला लागतो व प्राणाला मुकतो. तुकाराम महाराज म्हणतात “लोकहो पहा बोकडाच्यापुढे खाटकाने चारा टाकला की त्या बोकडाला त्या खाटकाविषयी प्रेम वाटते परंतु तोच खाटीक त्या बोकडाला नंतर मारतो”

भगवद्गीतेमध्ये जीव कसा डोळ्यासमोर दिसणाऱ्या विषयांमध्ये अडकला जातो ह्याबद्दलची साखळी भगवान कृष्ण उलगडून सांगत आहेत. (भ गी 2.62) ध्यायतो विषयान्पुंस: सङ्गस्तेषूपजायते। सङ्गात्सञ्जायतेकाम:कामातक्रोधोऽभिजायते।। अर्थात “इंद्रियविषयाचे चिंतन करीत असताना, मनुष्याची त्या विषयांच्या ठिकाणी आसक्ती वाढत जाते आणि अशा आसक्तीपासून काम उत्पन्न होतो आणि कामापासून क्रोधाचा उद्भव होतो. (भ गी 2.63) क्रोधाद्भवति सम्मोह: सम्मोहात्स्मृतिविभ्रम:। स्मृतिभ्रंशाद्बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति।। अर्थात “क्रोधापासून संमोह निर्माण होतो आणि मोहापासून स्मृती भ्रमित होते. जेव्हा स्मृती भ्रमित होते तेव्हा बुद्धिनाश होतो तेव्हा मनुष्याचे पुन्हा भौतिक अंधकूपात पतन होते.”

Advertisement

हा झाला सर्वसामान्यविषयी लोकांचा ‘एप्रिल फूल’ पण हरिभक्त यापासून मुक्त असतात कारण ते इंद्रियविषयांचे चिंतन करीत नाहीत तर भगवंताच्या संबंधात सर्व वस्तू पाहतात आणि भगवान श्रीकृष्णाच्या सेवेत अर्पण करतात म्हणून ते कोणत्याही भौतिक बंधनात अडकत नाहीत. अशा हरिभक्तांबद्दल भगवान श्रीकृष्ण सांगतात (भगी2.64) रागद्वेषविमुक्तैस्तु विषयनिन्द्रियैश्चरन्। आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति।। अर्थात “पण आसक्ती आणि अनासक्ती यापासून मुक्त असणारा आणि स्वातंत्र्याच्या नियामक तत्त्वांनुसार इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये समर्थ असणारा मनुष्य भगवंताची कृपा प्राप्त करू शकतो.” पूर्णपणे श्रीकृष्णभक्तीमध्ये समर्पित असलेला भक्त जरी वरकरणी विषयी स्तरावर असला तरी तो कायम श्रीकृष्णाचे चिंतन करीत असल्याने त्याला विषयी कर्मामध्ये आसक्ती नसते.

तुकाराम महाराज या जगामध्ये जीवांचा ‘एप्रिल फूल’ कसा होतो याबद्दल एका अभंगात म्हणतात सर्प भुलोन गुंतला नादा । गाऊडियें फांदां घातलासे। हिंडवुनि पोट भरी दारोदारिं । कोंडुनि पेटारी असेरया।।1।। तैसी परी मज जाली पांडुरंगा । गुंतलों तो मी गा सोडवी आतां । माझें मज कांहीं न चलेसें जालें । कृपा हे तुज न करितां ।।ध्रु.।। आविसें मिन लावियला गळीं । भक्ष तो गिळी म्हणोनियां । काढूनि बाहेरी प्राण घेऊं पाहे । तेथे बापमाये कवण रया।।2।। पक्षी पिलयां पातलें आशा । देखोनियां फांसा गुंते बळें । मरण सायासे नेणें माया धांवोनि वोसरे। जीवित्वा नास जालीं बाळें ।।3।। गोडपणें मासी लिगाडीं गुंतली । सांपडे फडफडी अधिकाधिक। तुका म्हणे प्राण घेतला आशा । पंढरीनिवासा धाव घालीं।।4।। अर्थात “पुंगीच्या नादाला भुलल्याने सर्प गाऊड्याकडून पकडला जातो आणि गाऊडी त्याला पेटाऱ्यात कोंडून दारोदारी नेवून आपले पोट भरतो. अशीच माझी स्थिती झाली आहे. मी संसारपाशात गुंतून पडलो आहे. अशा परिस्थितीत तुझ्या कृपेशिवाय माझे काही चालत नाही. पांडुरंगा ! मला तुम्हीच यातून सोडवा. कोळ्याने गळाला लावलेले आमिष खाण्याच्या नादात गळ घशात अडकल्याने मासोळी कोळ्याच्या हाती सापडून मरते. अशा वेळी तिचे जन्मदाते मायबाप रक्षण करू शकतात का? पक्षी आपल्या पिल्लांना भेटण्याच्या आशेने घरट्याकडे परततात. परंतु आपल्या पिल्लांना फासेपारध्याने पकडले असल्याचे पाहून पिल्लांप्रती मायेमुळे त्यांना वाचविण्यासाठी पुढे सरसावतात. पण पिल्लांबरोबर तेदेखील प्राणास मुकतात. गोड खाण्याच्या लोभाने माशी वितळलेल्या गुळावर बसते आणि पंख गुळाला चिटकून अडकते. तिच्या पंखाची फडफड तिला अधिकाधिक अडकवीत जाते. तुकाराम महाराज म्हणतात, “त्याचप्रमाणे मी देखील आशा आकांक्षामध्ये अडकलो आहे, त्यामुळे प्राण जात आहे. हे पंढरीनिवासा ! आता धाव घे आणि यातून मला सोडव.”

या जगामध्ये वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय स्तरावर जितके म्हणून प्रŽ सोडविण्याचा प्रयत्न करू तितके त्यात अधिकाधिक गुंतून पडतो. कितीही प्रामाणिक प्रयत्न केले तरी सर्वांचे एकमत होईल असा मार्ग किंवा उपाय आपणासमोर येत नाही. उलट वरील अभंगात वर्णन केलेल्या मासा, सर्प, पक्षी किंवा माशीप्रमाणे आपली तडफड होऊन प्राण जायची वेळ येते. आणि असे हे आशा आकांक्षांनी भरलेले जीवन मनुष्य जन्माचे सार्थक न करताच फसवणूक होऊन वाया जाते.

अशा ह्या शरीराला अनेक प्रकारचे विषयभोग करून सुख देण्याचा प्रयत्न करू नये आणि त्याचा त्याग करून दु:खही देऊ नये, कारण हे शरीर चांगलेही नाही आणि वाईटही नाही. म्हणून त्याचा ‘एप्रिल फूल’ होण्याआधी हरीच्या भजनी मोठ्या त्वरेने उपयोग करावा.

आपण राहत असलेले जग हे अनेक दु:ख आणि समस्यांनी भरलेल्या चिखल, दलदलीप्रमाणे आहे. या चिखलातून चालताना एक ऊतलेला पाय काढण्यासाठी दुसरा पाय जरा जोराने दाबला तर तो जास्तच अडकून बसतो. आपण सुटका करून घेण्यासाठी ज्याची मदत घेत आहोत, तेंही आपल्यापेक्षा मोठे असले तरी आपल्यासारखेच इंद्रियतृप्तीच्या चिखलात अडकले आहेत. यासाठी दलदलीने भरलेल्या जगाच्या बाहेरील व्यक्तीचीच, ज्याला आपल्यासारख्यांचे दु:ख पाहून कळवळा येतो आणि जो खरोखरच आपल्याला बाहेर पडण्यास अशक्मय अशा दलदलीतून बाहेर काढण्यासाठी सामर्थ्यवान आहे-अशा व्यक्तीचीच मदत घेतली पाहिजे. अशी एकमेव सामर्थ्यवान व्यक्ती म्हणजे भगवान श्रीकृष्ण होय. याची जाणीव आपल्याला संत तुकारामांसारखे वैष्णव वारंवार करून देत असतात. यासाठी मृगजळासारख्या खऱ्या वाटणाऱ्या पण वास्तवात फसव्या जगात आपली मनुष्य जन्माची फसवणूक म्हणजे ‘एप्रिल फूल’ करून घेण्याऐवजी भगवान श्रीकृष्णांच्या चरणाचा आश्र्रय घेऊन या दु:खमय फसव्या जगातून कायमची मुक्ती मिळवणे श्रेयस्कर आहे.

- वृंदावनदास

Advertisement
Tags :

.