बेळगावच्या सिंचन प्रकल्पांना मंजुरी द्या
खासदारांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
बेळगाव : बेळगाव जिल्हा लघु पाटबंधारे विभागाकडून प्रधानमंत्री सिंचन योजनेंतर्गत 143 कामांचे सुमारे 521 कोटी रुपयांचे तीन प्रस्ताव राज्य सरकारने केंद्रीय जल-ऊर्जा मंत्रालयाकडे पाठविले आहेत. हे प्रस्ताव लवकर मंजूर करावेत, यामुळे शेतकऱ्यांना शेतीला पाणीपुरवठा करणे सोयीचे होईल, अशी मागणी खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय जल-ऊर्जा मंत्री सी. आर. पाटील यांच्याकडे केली. खासदार शेट्टर यांनी बुधवारी केंद्रीय जल-ऊर्जा मंत्र्यांची भेट घेऊन बेळगाव जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांची माहिती दिली. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत राज्य सरकारने तीन प्रस्ताव केंद्रीय जल-ऊर्जा मंत्र्यांकडे सादर केले आहेत. हे प्रस्ताव मंजूर झाल्यास जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे हे प्रस्ताव लवकर मंजूर करावेत, अशी मागणी खासदारांनी केली. केंद्रीय मंत्र्यांनी खासदारांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला.