कणकुंबी-तळावडे संपर्क रस्ता दुरुस्तीसाठी निधी मंजूर करा
खडीकरणानंतर एकदासुद्धा डांबरीकरण न केल्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था : रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
वार्ताहर/जांबोटी
कणकुंबी-तळावडे या संपर्क रस्त्याची दुरवस्था झाली असून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी तळावडे ग्रामस्थांमधून होत आहे. कणकुंबी माउली मंदिरपासून ते तळावडे गावापर्यंतच्या संपर्क रस्त्याचे अंतर साधारण 8 किलोमीटर आहे. या रस्त्याच्या दुतर्फा केवळ गटारी खोदून रस्त्याची निर्मिती करण्यात आली आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी या रस्त्याच्या काही भागाचे खडीकरण करण्यात आले होते. मात्र या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अद्याप निधीच मंजूर झाला नसल्यामुळे या रस्त्याचे आतापर्यंत एकदासुद्धा डांबरीकरण करण्यात आले नसल्यामुळे या रस्त्याची अवस्था दयनीय बनली आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून रस्त्याच्या मधोमध गटारीसदृश्य चरी पडल्या आहेत. केवळ उन्हाळ्dयाच्या दिवसात या रस्त्यावरून दुचाकी व चारचाकी वाहने चालविता येतात. रस्त्याअभावी तळावडे ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
श्वापदांच्या वर्दळीमुळे विद्यार्थी वर्गाला जीव मुठीत घेऊन पायपीट करण्याची वेळ
तळावडे गावचा समावेश जरी गोल्याळी ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात होत असला तरी या गावच्या नागरिकांचा बाजारहाट, शिक्षण, बँक आदी गोष्टींसाठी कणकुंबी गावाशी रोजचा संपर्क आहे. तळावडे गावातील असंख्य विद्यार्थी माध्यमिक शिक्षणासाठी कणकुंबी येथे येतात. मात्र त्यांना 8 किलोमीटर अंतर जंगलातून पायपीट करावी लागते. तसेच हा रस्ता जंगलातून गेला असल्याने या रस्त्यावर अस्वले, हत्ती, बिबट्या, वाघ यासारख्या रानटी श्वापदांची वर्दळ असल्यामुळे विद्यार्थी वर्गाला जीव मुठीत घेऊन पायपीट करावी लागते.
पूल म्हणजे केवळ शोभेची वस्तू
तळावडे-कणकुंबी रस्त्यावरील मलप्रभा नदीवर सुमारे 18 वर्षांपूर्वी, माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या प्रयत्नातून नाबार्ड योजनेतून लाखो रुपये खर्चून पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. पुलाच्या निर्मितीमुळे या रस्त्यावरील मोठी समस्या दूर झाली आहे. मात्र तळावडे संपर्क रस्त्याची अद्याप पक्की दुरुस्ती करण्यात आली नसल्यामुळे हा पूल म्हणजे केवळ शोभेची वस्तू बनली आहे.
लोकप्रतिनिधींनींबद्दल नाराजी
तळावडे संपर्क रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करावा, या मागणीसाठी नागरिकांनी आमदार, खासदारांपासून सर्वच लोकप्रतिनिधी तसेच अधिकारी वर्गांना अर्ज, निवेदने दिली. मात्र या रस्त्याची समस्या जैसे थे असल्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. तरी खानापूर जिल्हा पंचायत विभागाच्या वरिष्ठ अभियंत्यांनी लक्ष घालून तळावडे रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणासाठी निधी मंजूर करून रस्त्याअभावी होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी तळावडे ग्रामस्थांमधून होत आहे.