बेळगाव फ्लायओव्हरसह इतर योजनांना मंजुरी द्या!
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना विनंती
प्रतिनिधी/ बेंगळूर
बेळगाव शहरातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने फ्लायओव्हरची (एलिवेटेड कॉरिडॉर) निर्माण करण्याची योजना आखली आहे. राष्ट्रीय महामार्ग-4 पासून चन्नम्मा सर्कलपर्यंत हा फ्लायओव्हर तयार करण्याचे नियोजन असून याकरिता 450 कोटी रुपये अनुदानाची गरज आहे. सदर योजनेसह इतर योजनांना मंजुरी द्यावी, अशी विनंती केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन दिले आहे.
नवी दिल्ली दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी केंद्रीय मंत्रही नितीन गडकरी यांची भेट घेऊन निवेदन दिले. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी, डॉ. एच. सी. महादेवप्पा व इतर नेते उपस्थित होते. कर्नाटकातील राष्ट्रीय महामार्गांचे जाळे विकसित करण्यासाठी केंद्र सरकारने 6 योजना मंजूर केलयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी गडकरींचे आभार मानले. तसेच अधिक वाहतूक असणाऱ्या राज्य महामार्गांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा द्यावा तसेच राज्याच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी बेळगावमधील फ्लायओव्हरसह इतर योजनांना मंजुरी द्यावी, अशी विनंती निवेदनाद्वारे केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे.
बेळगावमधील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्गापासून चन्नम्मा सर्कलपर्यंत 4.50 कि. मी. लांबीचा फ्लायओव्हर निर्माण करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम खात्याने घेतला आहे. याकरिता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने यापूर्वीच आराखडा तयार केला आहे. सदर योजनेचे काम हाती घेण्यासाठी केंद्र सरकारकडून अनुदान मंजुरीची प्रतीक्षा आहे. या योजनेसह इतर 11 रस्ते योजनांसाठी अनुदान व मंजुरीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना बुधवारी निवेदन देण्यात आले.
त्याचप्रमाणे पुणे-बेंगळूर ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस-वे ला देखील तातडीने मंजुरी द्यावी, अशी विनंती राज्य सरकारच्यावतीने करण्यात आली आहे. सदर योजना ‘भारतमाला’ योजनेंतर्गत राबविण्यात येणार आहे. कर्नाटकातील 9 आणि महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यांमधून जाणारा 700 कि. मी. लांबीचा हा आठपदरी मार्ग असणार आहे.
2025-26 च्या राष्ट्रीय महामार्गांच्या कामांसाठी 24,000 कोटींपर्यंत अनुदान वाढविणे, म्हैसूरमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग-275 वर 9 ग्रेड सेपरेटर निर्माण, राष्ट्रीय महामार्ग-75 वर शिराडी घाटातील मारनहळ्ळी ते अ•होळेपर्यंत भुयारीमार्ग, बेंगळूरच्या हेब्बाळ जंक्शनजवळ राष्ट्रीय महामार्ग-44 वर उ•ाणपूल निर्माण करणे, तत्वत: मंजुरी मिळालेल्या रस्त्यांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देणे, कलबुर्गी-वाडी-यादगिरी-केंदेचूर-जडचेर्ला दरम्यान चारपदरी मार्ग निर्माण करणे, देवल गाणगापूर ते पंढरपूरपर्यंतच्या रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग घोषित करणे या मागण्यांचीही पुर्तता करण्याची विनंती निवेदनाद्वारे केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे.