चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाक वारी सरकारच्या मान्यतेवर अवलंबून
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दीर्घकाळापासूनच्या भूमिकेचा पुनऊच्चार करताना पुढील वर्षीच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी राष्ट्रीय क्रिकेट संघाने पाकिस्तानात जायचे की नाही हा निर्णय सरकारच्या मान्यतेवर अवलंबून असेल, असे स्पष्ट केले आहे. पाकिस्तानमध्ये 19 फेब्रुवारी ते 9 मार्च या कालावधीत सदर एकदिवसीय सामन्याच्ंया स्पर्धेचे आयोजन होणार आहे.
कोणताही निर्णय अद्याप घेतलेला नाही. पण आमचे धोरण असे आहे की, आंतरराष्ट्रीय दौऱ्यांसाठी आम्ही नेहमी सरकारची परवानगी घेतो. आमच्या संघाने कोणत्याही देशात जायचे की जाऊ नये हे ठरविणे सरकारच्या हाती आहे, असे शुक्ला यांनी येथे पत्रकारांना सांगितले. या प्रकरणात सुद्धा सरकार जो काही निर्णय घेईल त्याचे आम्हा पालन करू, असेही ते म्हणाले. भारत आणि बांगलादेश यांच्यात सध्या सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या निमित्ताने शुक्ला प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
भारत आणि पाकिस्तान मागील बऱ्याच काळापासून फक्त आयसीसी स्पर्धांमध्ये एकमेकांशी खेळत आले आहेत. मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर 2008 पासून भारताने द्विपक्षीय क्रिकेटसाठी पाकिस्तानला भेट दिलेली नाही. पाकिस्तान सात वर्षांनंतर गेल्या वर्षी एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकासाठी भारतात आला होता. भारत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला न जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे बीसीसीआय ‘आयसीसी’ला सदर स्पर्धा पाकिस्तानबाहेर खेळविण्याचज आणि श्रीलंका किंवा दुबईमध्ये आयोजित करण्याची विनंती करू शकते. भारताच्या या भूमिकेमुळे आशिया चषक स्पर्धा संकरित मॉडेलनुसार खेळविली गेला होती. पाकिस्तान क्रिकेट मंडळ (पीसीबी) चॅम्पियन्स चषक स्पर्धा देशाबाहेर नेण्याच्या कल्पनेला विरोध करत आहे.