अपाचे, होवित्झर विषयक उपकरणांच्या विक्रीला मंजुरी
भारतीय सैन्याचे वाढणार सामर्थ्य : अमेरिकेकडून 428 दशलक्ष डॉलर्सचे पॅकेज मंजूर
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने भारतासाठी एएच-64ई अपाचे हेलिकॉप्टर आणि एम-777 ए2 अल्ट्रा-लाइट होवित्झरच्या दुरुस्तीसाठी 428.2 दशलक्ष डॉलर्सच्या पॅकेजला मंजुरी दिली आहे. या पॅकेज अंतर्गत या अपाचे हेलिकॉप्टर आणि तोफांची दुरुस्ती आणि देखभाल करण्यात येणार आहे. अमेरिकेच्या विदेश विभागाने या पॅकेजला मंजुरी दिली आहे. या प्रस्तावित करारांची घोषणा ब्यूरो ऑफ पॉलिटिकल-मिलिट्री अफेयर्सने वेगवेगळ्या काँग्रेसनल नोटिफिकेशन्समध्ये केली आहे.
एम-777 ए2 अल्ट्रा-लाइट होवित्झरसाठी दीर्घकाळापर्यंत देखभाल सपोर्टच्या पॅकेजची अनुमानित किंमत 230 दशलक्ष डॉलर्स आहे. यात ‘सहाय्यय सामग्री, सुटे भाग, दुरुस्ती अन् वापसी, प्रशिक्षण, तांत्रिक सहाय्य, फील्ड सर्व्हिस प्रतिनिधी, डेपो क्षमता आणि लॉजिस्टिक्स प्रोग्राम सपोर्ट असेल. याचबरोबर होवित्झर सपोर्ट पॅकेजसाठी मुख्य कंत्राटदार बीएई सिस्टीम्स असेल असे सांगण्यात आले ओ.
अपाचे हेलिकॉप्टर्सच्या पुढील सहाय्य सेवा आणि संबंधित उपकरणांच्या विक्रीसाठी दुसऱ्या पॅकेजची किंमत 198.2 दशलक्ष डॉलर्स असून याकरता कंत्राटदार बोइंग अणि लॉकहीड मार्टिन आहे. भारतीय सैन्याला 2017 मध्ये अमेरिकेकडून 2 आर्टिलरी गन्स प्राप्त झाल्या होत्या. याचबरोबर अमेरिकेच्या विदेश विभागाने अपाचे हेलिकॉप्टर्सशी निगडित 198.2 दशलक्ष डॉलर्सच्या संभाव्य विक्रीला मंजुरी दिली आहे.
प्रस्तावित विक्रीमुळे हिंद-प्रशांत क्षेत्रात अमेरिकेच्या मोठ्या रणनीतिक लक्ष्यांना समर्थन मिळणार असल्याचे अमेरिकेच्या विदेश विभागाने नमूद केले आहे. ही प्रस्तावित विक्री अमेरिका-भारताच्या रणनीतिक संबंधांना मजबूत करणे आणि एक प्रमुख संरक्षण भागीदाराच्या सुरक्षेला प्रभावी करण्यास मदत करत अमेरिकेचे विदेश धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या लक्ष्यांना समर्थन करणार आहे. हा भागीदार हिंद-प्रशांत आणि दक्षिण आशिया क्षेत्रामध्ये राजकीय स्थिरता, शांतता आणि आर्थिक प्रगतीसाठी एक महत्त्वपूर्ण शक्ती ठरला असल्याचे म्हटले गेले आहे.
भारताच्या क्षमतेला मजबुती
प्रस्तावित विक्रीमुळे भारताच्या वर्तमान आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता वाढणार आहे, तसेच त्याची देशांतर्गत सुरक्षा मजबूत होत क्षेत्रीय धोक्यांना रोखता येईल. भारताला या सामग्री आणि सेवांना स्वत:च्या सैन्यात सामील करण्यास कुठलीच अडचण येणार नाही. प्रस्तावित विक्रीतून क्षेत्रात मूलभूत सैन्य संतुलन बदलणार नाही आणि याचा अमेरिकेच्या संरक्षण तत्परतेवर कुठलाच प्रतिकूल प्रभाव पडणार नसल्याचे अमेरिकेच्या विदेश विभागाने स्पष्ट पेले आहे.
भारतीय सैन्याकडे अपाचे हेलिकॉप्टर
भारतीय भूदल आणि वायुदलाकडे एकूण 28 अपाचे हेलिकॉप्टर्स आहेत. हे हेलिकॉप्टर जगातील सर्वात आधुनिक लढाऊ हेलिकॉप्टर्सपैकी एक आहे आणि त्यांना ‘फ्लाइंग टँक’ असेही म्हटले जाते.