1971 च्या युद्धाचे चित्र सर्वात योग्य ठिकाणी : सैन्य
माणेकशॉ सेंटरमध्ये झळकतेय संबंधित चित्र : संसदेत उपस्थित झाला होता मुद्दा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सैन्यप्रमुखांच्या लाउंजमध्ये लावण्यात आलेल्या पाकिस्तानी सैन्याच्या शरणागतीच्या चित्रावरून सैन्याचे वक्तव्य समोर आले आहे. 1971 च्या युद्धाचे छायाचित्र हटविण्यात आलेले नाही, ते सर्वात योग्य ठिकाणी म्हणजेच दिल्लीच्या माणेकशॉ सेंटरमध्ये हलविण्यात आले असून तेथे ते अधिकाधिक लोक पाहू शकतील हा यामागील उद्देश होता असे सैन्याने म्हटले आहे.
सैन्यप्रमुखांच्या लाउंजमध्ये 1971 च्या पाकिस्तानी सैन्याच्या शरणागतीचे चित्र बदलून एक नवी कलाकृती लावण्यात आली आहे. यात लडाखचा पॅँगोंग त्सो, महाभारताने प्रेरित विषय-वस्तू आणि आधुनिक युद्ध दर्शविण्यात आले असून जे बहुधा चीनसोबत उत्तर सीमेवर भारताच्या वाढत्या रणनीतिक लक्षाला दर्शविते.
बांगलादेश मुक्ती संग्रामदरम्यान पाकिस्तानी सैन्याच्या शरणागतीला दर्शविणारे छायाचित्र हटविण्याचा मुद्दा संसदेत उपस्थित झाला होता. लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस खासदार प्रियांका वड्रा यांनी यासंबंधी प्रश्न विचारला होता. भारताचा सैन्य इतिहास आणि इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील सरकारच्या वारशालाकमी लेखण्याचा आरोप त्यांनी सरकारवर केला होता.
संबंधित छायाचित्र 16 डिसेंबर 1971 मधील आहे. ढाक्याच्या रेसकोर्समध्ये हे छायाचित्र काढण्यात आले होते. यात पाकिस्तानचे लेफ्टनंट जनरल ए.ए.के. नियाजी आणि भारताच्या ईस्टर्न थिएटरचे कमांडर लेफ्टनंट जनरल जगजीत सिंह अरोडा दिसून येतात. नियाजी हे एका दस्तऐवजावर स्वाक्षरी करत असून त्यांच्यामागे भारतीय सैन्याचे अनेक अधिकारी उभे असल्याचे या छायाचित्रात दिसून येते. लेफ्टनंट जनरल नियाजी यांनी त्यावेळी कंबरेला लावलेले स्वत:चे पिस्तुल जगजीत सिंह यांच्याकडे सोपविले होते आणि 93 हजार पाकिस्तानी सैनिकांसोबत जगातील सर्वात मोठी शरणागती पत्करली होती.
आमच्या सर्वात मोठ्या विजयाचा पुरावा
हे चित्र भारतीय सशस्त्रदलांच्या सर्वात मोठ्या सैन्य विजयांपैकी एक आणि सर्वांसाठी न्याय आणि मानवतेबद्दल भारताच्या प्रतिबद्धतेचा पुरावा आहे. माणेकशॉ सेंटरमध्ये हे चित्र प्रदर्शित करण्यात आल्याने मोठ्या संख्येत लोक ते पाहू शकतील, कारण याच ठिकाणी भारत आणि विदेशातून लोक मोठ्या संख्येत पोहोचत असतात असे भारतीय सैन्याकडून म्हटले गेले आहे.
नवी कलाकृती
सैन्यप्रमुखांच्या लाउंजमध्ये आता नवी कलाकृती झळकली असून ती लेफ्टनंट कर्नल थॉमस जॅकब यांनी साकारली होती. या कलाकृतीला ‘कर्मक्षेत्र’ नाव देण्यात आले आहे. चित्रात प्राचीन भारताच्या तत्वांसोबत आधुनिक सैन्य दाखविण्यात आले आहे. यात महाभारतातील कृष्ण-अर्जुन, गरुड, चाणक्य, जल-थल आणि वायुदलाचा ताळमेळ, ड्रोन आणि पाणबुडी देखील सामील आहे. चित्रांच्या अदलाबदलीमागे मोठा संदेश दडलेला असल्याचे तज्ञांचे मानणे आहे. आत्मसमर्पणाच्या छायाचित्राद्वारे भारतीय सैन्याची मजबुती आणि शत्रूला गुडघ्यावर आणण्याची क्षमता प्रदर्शित करण्यात आली होती. आता कर्मक्षेत्र कलाकृतीद्वारे भारतीय सैन्य चीनला संदेश पाहू आहे की, चाणक्याची व्यूहनीति अणि भगवद्गीतेची शिकवण भारत अंगिकारत आहे.