For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताच्या डिजिटल क्रांतीचे कौतुक

06:08 AM Aug 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारताच्या डिजिटल क्रांतीचे कौतुक
Advertisement

गरिबी निर्मूलनात स्मार्टफोन्सचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचा संयुक्त राष्ट्रसंघ अध्यक्षांकडून उल्लेख

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारताने गेल्या पाच ते सहा वर्षांमध्ये 80 कोटी लोकांची गरिबी केवळ स्मार्टफोन्सचा उपयोग करून दूर करण्यात यश मिळविले आहे. भारतातील ही डिजिटल क्रांती साऱ्या जगात वैशिष्ट्यापूर्ण ठरली आहे, अशी भारताची प्रशंसा संयुक्त राष्ट्रसंघाचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांनी केली आहे. ते शुक्रवारी येथे एका प्रसारमाध्यमाने आयोजित केलेल्या अन्न आणि कृषी संघटनेच्या व्याख्यान कार्यक्रमात भाषण करीत होते. ‘भुकेवर मात करण्यासाठी विद्यमान आणि भविष्य काळातली प्रगती’ असा त्यांच्या भाषणाचा विषय होता.

Advertisement

भारताने डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून ग्रामीण भागात बँकिंग व्यवस्थेचे जाळे पसरविण्यात अत्यंत प्रभावी कामगिरी केली आहे. भारतातील 80 कोटी लोकांची गरिबी या क्रांतीमुळे दूर झाली असून त्यांचे जीवनमान उंचावले आहे. गेल्या 5 ते 6 वर्षांमध्येच हा चमत्कार घडला आहे. स्मार्टफोन्सच्या माध्यमातून आज भारतात ग्रामीण भागातील लोकही सहजगत्या बँकेशी संपर्क साधू शकतात. आतापर्यंत त्यांना बँकेच्या संपर्कात येण्याची संधी मिळत नव्हती. मात्र, डिजिटल क्रांती घडविण्याचा दूरदर्शीपणा दाखविल्याने हे घडले आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

इंटरनेटचे जाळे सर्वदूर

भारताने अत्यंत वेगाने इंटरनेटचे जाळे सर्वदूर पसरविले आहे. त्यासमवेतच आज स्मार्टफोन्सही भारतात खेडोपाडी मोठ्या संख्येने पोहचले आहेत. केवळ पाच ते सहा वर्षांमध्ये भारतासारख्या खंडप्राय देशात असे घडू शकेल यावर कोणाचाही विश्वास नव्हता. तथापि, भारताच्या धोरणकर्त्यांनी निर्धाराने ही क्रांती घडण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण केले आणि साऱ्या देशाला याचा लाभ मिळवून दिला. त्यामुळे दक्षिण गोलार्धातील देशांपेक्षा भारताची प्रगती झपाट्याने होत आहे. दक्षिण गोलार्धातील देशांनी डिजिटल क्रांतीकडे फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळे गरिबी निर्मूलनाच्या संघर्षात ते काहीसे मागे पडले. या देशांनीदेखील भारताचा आदर्श ठेवून डिजिटल क्रांतीवर भर द्यावा, अशी सूचना त्यांनी भाषणात केली.

डिजिटायझेशनवर मुख्य भर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गेल्या 10 वर्षांमध्ये डिजिटायझेशनवर प्रामुख्याने भर दिला आहे. त्यांच्या नेतृत्वातील सरकार येण्यापूर्वी डिजिटायझेशन प्रक्रिया केवळ महानगरांपुरती मर्यादित होती. इंटरनेट, स्मार्टफोन्स आदी आधुनिक तंत्रज्ञानाला भारताच्या ग्रामीण भागात इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल, अशी कोणालाही अपेक्षा नव्हती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने काळाची पावले ओळखून डिजिटल प्रसारावर भर दिला. त्यामुळे शिक्षण, आरोग्य, धान्य आणि इतर सामाजिक सेवा दुर्गम भागातील लोकांपर्यंत विनासायास आणि कमी खर्चात पोहचविणे केंद्र सरकार किंवा राज्य सरकारे यांना शक्य झाले आहे.

‘जॅम’ पुढाकार

जनधन, आधार कार्ड आणि मोबाईल (जॅम) या तीन माध्यमांमधून भारतीयांनी डिजिटल तंत्रज्ञानाला आपलेसे केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंबंधी मोठाच पुढाकार गेल्या 10 वर्षांमध्ये घेतला आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी भारताने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचे धाडसही दाखविले आहे. त्यामुळे आज भारत डिजिटल प्रगतीत अन्य अनेक विकसनशील देशांपेक्षा बराच पुढे आहे. भारतात आता जवळजवळ सर्व बँक खाती आधार कार्डाशी जोडली गेली आहेत. या जोडणीमुळे सर्व केंद्रीय अनुदाने आणि आर्थिक साहाय्य नागरिकांच्या खात्यांमध्ये डिजिटल पद्धतीने जमा केले जाते. तसेच ते डिजिटल पद्धतीने काढणेही नागरिकांना शक्य होते. केवळ पाच-सहा वर्षांपूर्वी अशी कल्पनाही केली जाऊ शकत नव्हती. या क्षेत्रात भारत एक महासत्ताच बनला आहे, असेही बोलले जाते.

केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण पुढाकार

ड भारताच्या डिजिटल क्रांतीची जगात सर्व क्षेत्रांकडून मन:पूर्वक प्रशंसा

ड डिजिटल क्रांतीमुळे नागरिकांना मोठा लाभ, सेवा पोहचतात घरापर्यंत

ड जनधन, आधार आणि मोबाईल या त्रिसूत्रीमुळे डिजिटल क्रांती शक्य

ड गरीबी उन्मूलनात या डिजिटल क्रांतीचे दूरगामी, महत्त्वपूर्ण योगदान

Advertisement

.