For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर नियुक्ती; ‘राष्ट्रपतीनियुक्त खासदार’ : पंतप्रधान मोदी यांनी ट्विट

06:55 AM Mar 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर नियुक्ती  ‘राष्ट्रपतीनियुक्त खासदार’   पंतप्रधान मोदी यांनी ट्विट
Advertisement

‘राष्ट्रपतीनियुक्त खासदार’ : पंतप्रधान मोदी यांनी ट्विट

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आणि सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपतीनियुक्त खासदार म्हणून त्यांना हे नामांकन प्राप्त झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या वतीने ही घोषणा करत त्यांना ‘महिला दिना’ची भेट दिली. तर, महिला दिनादिवशीच राज्यसभेसाठी आपल्या नामांकनाची घोषणा होणे ही दुहेरी आश्चर्याची गोष्ट असल्याचे वक्तव्य करत सुधा मूर्ती यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Advertisement

परोपकारी व्यक्तिमत्त्व आणि प्रख्यात लेखिका अशी ख्याती असलेल्या 73 वषीय सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर नियुक्ती जाहीर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या विविध क्षेत्रातील योगदानाचे कौतुक केले. संसदेच्या वरिष्ठ सभागृहात सुधा मूर्ती यांना स्थान मिळणे हा ‘नारी शक्ती’चा (महिला शक्ती) एक शक्तिशाली पुरावा असल्याचे ट्विट पंतप्रधानांनी केले आहे. इन्फोसिसचे सह-संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती या मूर्ती ट्रस्टच्या अध्यक्षा आहेत. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. आपल्या जीवनातील अमूल्य योगदानाबद्दल त्यांना 2006 मध्ये पद्मश्री आणि 2023 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

दुहेरी आनंदाची गोष्ट : सुधा मूर्ती

महिला दिनी राज्यसभेसाठी आपली नियुक्ती जाहीर होणे ही आपल्यासाठी दुहेरी आनंदाची बाब असल्याचे परोपकारासाठी प्रसिद्ध असलेल्या लेखिका सुधा मूर्ती यांनी शुक्रवारी सांगितले. मला खूप आनंद झाला आहे. मी आमच्या पंतप्रधानांची आभारी आहे. आपण कधीही या पदाची मागणी केली नाही आणि सरकारने आपल्याला उमेदवार का केले याची कल्पना नाही’ असे त्या पुढे म्हणाल्या. मूर्ती सध्या थायलंडच्या दौऱ्यावर आहेत.

कोण आहेत सुधा मूर्ती?

सुधा मूर्ती या इन्फोसिस फाऊंडेशनचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आहेत. त्यांना मुलगी अक्षता मूर्ती आणि मुलगा रोहन मूर्ती अशी दोन मुले आहेत. अक्षता नारायण मूर्ती या ब्रिटनस्थित भारतीय पॅशन डिझायनर आणि ब्रिटनच्या पंतप्रधानांची पत्नी आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे सुधा मूर्ती यांचे जावई आहेत. रोहन मूर्ती हे मूर्ती क्लासिकल लायब्ररी ऑफ इंडिया तसेच सोरोको या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन स्टार्टअपचे संस्थापक आहेत. सुधा मूर्ती या प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका म्हणूनही परिचित आहेत. त्यांनी आठ कादंबऱ्या लिहिल्या आहेत. भारतातील सर्वात मोठी ऑटो मॅन्युपॅक्चरिंग इंजिनिअरिंग आणि लोकोमोटिव्ह कंपनी टेल्कोमध्ये काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला अभियंत्या आहेत.

कर्नाटकशी दृढ नातेबंध

सुधा मूर्ती यांचा जन्म 19 ऑगस्ट 1950 रोजी उत्तर कर्नाटकातील हावेरीमधील शिग्गाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव आर. एच. कुलकर्णी आणि आईचे नाव विमला कुलकर्णी आहे. त्यांनी हुबळीच्या बीव्हीबी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली. 150 विद्यार्थ्यांमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवणाऱ्या सुधा या पहिल्या महिला होत्या. वर्गात त्या पहिल्या आल्यावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना पदक देऊन गौरविले. नंतर त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून कॉम्प्युटर सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली.

Advertisement
Tags :

.