जि.प.आरोग्य विभागात २४६ आरोग्य सेविकांची नियुक्ती
सीईओ कार्तिकेयन एस यांची माहिती
समुपदेशनाने दिले नियुक्ती आदेश
कोल्हापूर
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत आरोग्य सेवक (महिला) सरळसेवा भरतीसाठी 406 पदांची जाहिरात दिली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा निवड समितीने कागदपत्रांची छाननी करून उत्तीर्ण 486 उमेदवारांपैकी अपात्र, गैरहजर आणि नकार दिलेल्या उमेदवारांना वगळून 370 उमेदवारापैंकी 246 पात्र उमेदवारांची समुपदेशन प्रक्रियेद्वारे नियुक्ती केली, अशी माहिती सीईओ कार्तिकेयन एस यांनी दिली.
शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहामध्ये सीईओ कार्तिकेयन एस यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांच्या नियंत्रणाखाली आरोग्य विभागातील आरोग्य सेवक (महिला) पदांसाठी समुपदेशनाने अत्यंत पारदर्शकपणे नियुक्ती करण्यात आली.
सुरुवातीला मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी मार्गदर्शक सूचना देऊन समुपदेशांचे नियम व अटींची माहिती सांगितली.
या भरतीमुळे कोल्हापूर जिल्हयातील मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेल्या पदाचा अनुशेष या भरतीमुळे कमी होईल. तसेच सद्यस्थितीत रिक्त असलेल्या पदांमुळे कार्यरत कर्मचाऱ्यांकडील अतिरिक्त कामकाजाचा ताण कमी होणार आहे. परिणामी ग्रामीण भागातील आरोग्य सेवा, सुविधांमध्ये वाढ होणार आहे. सर्व निवड झालेल्या उमेदवारांना ग्रामीण भागातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरांवरील राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी, संस्थात्मक प्रसुती, आरोग्य विषय कामकाज, ग्रामीण भागातील गरोदर माता व लहान बालकांच्या विविध आरोग्य सेवा देणे, आदी राष्ट्रिय आरोग्य कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे सोयीचे होणार आहे. आजपर्यंतची ही सर्वात मोठी भरती असल्याचे सीईओ कार्तिकेयन एस यांनी सांगितले. त्यामुळे कोल्हापूर जिल्हयाचा आरोग्य विषयक निर्देशांक उचांवण्यास मदत होणार असल्याचे स्पष्ट करून निवड झालेल्या उमेदवारांचे त्यांनी अभिनंदन केले.