थायलंडमध्ये एक दिवसाचा नेता नियुक्त
वृत्तसंस्था / बँकॉक
थायलंड या देशात 2001 चा बॉलिवुड चित्रपट ‘नायक’ ची पुनरावृत्ती राजकारणात घडली आहे. या चित्रपटात अनिर कपूर हा अभिनेता एक दिवसाकरिता मुख्यमंत्री होतो असे दाखविण्यात आले आहे. त्याचप्रकारे थायलंडमध्येही केवळ एका दिवसासाठी सुरिया जुंग्रुनग्रेकिट यांना देशाच्या नेतेपदी विराजमान करण्यात आले आहे. हे पद मिळविण्यापूर्वी ते देशाचे उपनेते होते.
थायलंडच्या नेत्या पेटोंगटार्न शिनावर्ता यांची तेथील सर्वोच्च न्यायालयाने शिष्टाचाराचा भंग केल्याच्या प्रकरणात हकालपट्टी केली होती. त्या माजी नेते थाकसिन शिनावर्ता यांच्या कन्या आहेत. त्यांनी थायलंडच्या शेजारील देश कंबोडियासंबंधात शिष्टाचाराचा भंग केला असा त्यांच्यावर आरोप होता. त्यामुळे त्यांना नेतेपद गमवावे लागले. त्यानंतर केवळ एक दिवसासाठी जुंग्रुनग्रेकिट यांची नेतेपदी नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती एका समारंभात बाधा येऊ नये म्हणून केल्याचे स्पष्ट करण्यात आले. नेतेपदी नियुक्त झाल्यानंतर जुंग्रुनग्रेकिट यांनी देशाच्या सर्वोच्च नेत्याच्या कार्यालय स्थापनेच्या 93 व्या दिनाच्या कार्यक्रमाचे नेतृत्व केले. हा कार्यक्रम बुधवारीच होणे आवश्यक होते. तसेच तो देशाच्या नेत्याच्या नेतृत्वातच होणे अनिवार्य होते. त्यामुळे ही नियुक्ती करण्यात आली. जुंग्रुनग्रेकिट हे या नियुक्तीपूर्वी देशाचे परिवहन मंत्री आणि देशाचे उपनेते होते.
इतिहासात प्रथमच
केवळ एक दिवसासाठी देशाच्या सर्वोच्च नेत्याची नियुक्ती करण्यात येण्याची ही घटना थायलंडच्या इतिहासात प्रथमच घडल्याचे बोलले जात आहे. याच एक दिवसात देशाच्या मंत्रिमंडळाची पुनर्रचना झाली. त्यात फुमथाम वेचायाचेयी यांना गृहमंत्रीपद देण्यात आले. तसेच इतर अनेक नव्या मंत्र्यांची घोषणा करण्यात आली. आता जुंग्रुनग्रेकिट यांचे औट घटकेचे सर्वोच्च नेतेपद गेल्यानंतर त्यांना त्यांचे जुने पदही मिळण्याची शक्यता दुरावली आहे, असे बोलले जात आहे.