प्राणी संग्रहालयामध्ये पूर्णवेळेसाठी कार्यकारी संचालकांची नेमणूक करा
वन्यजीव संरक्षक गिरिधर कुलकर्णी यांचे मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्र्यांना मागणीचे पत्र
बेळगाव : भुतरामहट्टीतील राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयात ऑगस्ट 2020 मध्ये मी दत्तक घेतलेला काळवीट हा पहिला प्राणी होता. आज 30 हून अधिक काळविटांचा मृत्यू होणे ही माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी बाब आहे. सध्या या प्राणीसंग्रहालयाचे पदसिद्ध कार्यकारी संचालक हे बेळगाव विभागाचे उपवनसंरक्षक (डीसीएफ) आहेत. मात्र, या महत्त्वाच्या प्राणीसंग्रहालयामध्ये पूर्ण वेळासाठी कार्यकारी संचालक (डीसीएफ दर्जा) पद निर्माण करावे, अशा मागणीचे पत्र वन्यजीव संरक्षक गिरिधर कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या व पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना पाठविले आहे.
या पत्रात ते नमूद करतात, की वन्यजीव संवर्धन ही आमची जबाबदारी असे आम्ही मानतो. म्हणूनच मी, माझ्या कुटुंबातील, माझे सहकारी यांनी या प्राणीसंग्रहालयातील बिबट्या, पट्टेदार तरस, काळवीट, ठिपकेदार हरीण, चार शिंगांचे काळवीट, पॅराकिट आणि इतर अनेक प्राणी दत्तक घेतले आहेत. यापैकी सर्वप्रथम मी काळवीट दत्तक घेतला होता. आज काळविटांचा मृत्यू होणे ही माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आणि प्राणीसंग्रहालय व वन्यजीवांसाठी दुर्दैवाची बाब आहे.
सध्या या प्राणीसंग्रहालयाचा पदभार उपवनसंरक्षक सांभाळत आहेत. बेळगाव वनविभाग हा पर्यावरणदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असून राज्याच्या वायव्य भागात हे क्षेत्र आहे. गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमांना तसेच धारवाड, विजापूर, बागलकोट व उत्तर कन्नड जिल्हा यांच्याशी हे क्षेत्र संलग्न आहे. 1,23,047 हेक्टर अधिसूचीमध्ये हे वनक्षेत्र असून यामध्ये नागरगाळी, खानापूर, बेळगाव या तीन उपविभागांचा समावेश आहे. बेळगाव, गोळीहळ्ळी, गुजनाळ, हुक्केरी, नेसरगी, काकाठी, कणकुंबी, खानापूर, लोंढा, नागरगाळी आणि भीमगड वन्यजीव श्रेणी अशा अकरा वनविभागांचा यामध्ये समावेश आहे. शिवाय हाच विभाग भुतरामहट्टी प्राणीसंग्रहालयाची देखरेख करतो. याचे नेतृत्व आरएफओ करतात.
जबाबदारी पार पाडणे कठीण
या विभागात पर्यावरणीयदृष्ट्या भीमगड वन्यजीव अभयारण्याचाही समावेश आहे. जेथे वाघ, बिबट्या, कोल्हा, हत्ती, भारतीय गौर, सांबर, हरीण, किंग कोब्रा यांचा समावेश आहे. शिवाय वटवाघुळांचा प्रजनन अधिवास येथे आहे. त्यामुळे वनविभागाला बेकायदेशीर वृक्षतोड, शिकार, अतिक्रमण, प्राण्यांचे मानवी वसाहतीतील आक्रमण तसेच मानवनिर्मित धोक्यांमुळे सतत दबावाखाली काम करावे लागते. शिवाय राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक योजना व वनीकरण कार्यक्रम घेण्याची जबाबदारीसुद्धा त्यांच्यावर असल्याने एकाच वेळी याच विभागाला प्राणीसंग्रहालयाची जबाबदारी पार पाडणे कठीण होत आहे, याकडे गिरिधर कुलकर्णी यांनी लक्ष वेधले आहे.
कर्नाटकातील इतर प्रमुख प्राणीसंग्रहालय ज्यामध्ये बन्नेरघट्टा, चामराजेंद्र प्राणीसंग्रहालय, त्यावरेकोप्पा आणि कमलापूर येथील प्राणीसंग्रहालयांमध्ये डीसीएफ दर्जाचे स्वतंत्र असे पूर्णवेळ कार्यकारी संचालक आहेत. भुतरामहट्टी प्राणीसंग्रहालयाचे महत्त्व वाढत असून त्यामध्ये प्राण्यांचा वाढता संग्रह, सार्वजनिक दत्तक क्षमता, विकासकामे व लघु प्राणीसंग्रहालय ते मध्यम दर्जाचे प्राणीसंग्रहालय करण्याचाही प्रस्ताव आहे. अशा विस्तारासाठी पूर्णवेळ कार्यकारी संचालकच आवश्यक आहे, असेही कुलकर्णी यांनी सुचविले.
पूर्णवेळ अधिकाऱ्यांमुळे लक्षणीय सुधारणा होईल
काळविटांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर आता या प्राणीसंग्रहालयासाठी पूर्णवेळ कार्यकारी संचालक हे पद निर्माण करून बेळगाव विभागाला या अतिरिक्त जबाबदारीतून मुक्त करावे, पूर्णवेळ अधिकाऱ्यामुळे प्राणीसंग्रहालयाच्या व्यवस्थापनामध्ये लक्षणीय सुधारणा होईल. त्यामुळे वन्यजीव संरक्षण आणि संस्थात्मक बळकटीकरणाच्या हिताच्यादृष्टीने मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी या मागणीचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी गिरिधर कुलकर्णी यांनी केली आहे.