For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पणजी महानगरपालिका निवडणुकीसाठी मोन्सेरात गटाच्या उमेदवारांचे अर्ज दाखल

01:03 PM Feb 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
पणजी महानगरपालिका निवडणुकीसाठी मोन्सेरात गटाच्या उमेदवारांचे अर्ज दाखल
Advertisement

पणजी : पणजीचे आमदार व महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या गटातर्फे पणजी महानगरपालिकेच्या सर्व 30 प्रभागांसाठी 30 उमेदवारांनी निवडणुकीचे अर्ज सादर केले पण त्यावेळी ते स्वत: उपस्थित नव्हते. त्यांचे पूत्र असलेले महापौर रोहीत मोन्सेरात यांनी उमेदवार म्हणून हजेरी लावली. भाजपचे बडे नेतेही यावेळी हजर नसल्याचे दिसून आले. त्यामुळे हे उमेदवार भाजप गटाचे की मोन्सेरात गटाचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मोन्सेरात गटाच्या सर्व 30 उमेदवारांनी काल शुक्रवारी प्रथम पणजी येथील महालक्ष्मी मंदिरात एकत्र जमून देवीचे आशीर्वाद घेतले आणि भटजीमार्फत गाऱ्हाणे घालून विजयासाठी प्रार्थना केली. तेथेही मंत्री मोन्सेरात तसेच भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित नसल्याचे दिसून आले. तेथून सर्व 30 उमेदवारांनी पायी चालत उपजिल्हाधिकारी कार्यालय गाठले आणि तेथे अर्ज भरले. त्यावेळी मोन्सेरात समर्थक कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती.

Advertisement

मोन्सेरात गटातील प्रभागवार उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे

प्रभाग 1 - युतिका श्रीकांत जांबावलीकर, 2 - कॅरोलिना पो, 3 -मार्गारेट फर्नांडिस, 4 - रोहीत मोन्सेरात, 5 - किशोर शास्त्री, 6 - बेन्तो लॉरेन्स, 7 - संजीव देसाई, 8 - करीना शिरोडकर, 9 - कबरी मखीजा, 10 - प्रसाद आमोणकर, 11 - तुकाराम चिन्ननावार, 12 - वर्षा हरी शेटये, 13 - उदय मडकईकर, 14 - प्रज्योत वायंगणकर, 15 - शायनी चोपडेकर, 16 - अस्मिता केरकर, 17 - डेनिस जॉर्ज, 18 - कृष्णा शिरोडकर, 19 - निकीता नाईक,20 - शुभम चोडणकर, 21 - मनिषा मणेरकर, 22 - दीक्षा माईणकर, 23 - विद्या गडकर, 24 - करण यतीन पारेख, 25 - कीर्ती साखळकर, 26 - वसंत आगशीकर, 27 - विठ्ठल चोपडेकर, 28 - रुपेश हळर्णकर, 29 - सेंड्रा डिकुन्हा, 20 - सिल्वेस्टर फर्नांडिस.

Advertisement

सर्व 30 उमेदवारांचे अर्ज भरुन ते सादर करेपर्यंत दोन तासाहून अधिक कालावधी लागला. नंतर सर्व उमेदवार निर्वाचन अधिकारी कार्यालयाबाहेर आले आणि त्यांनी एकत्र राहून दोन बोटांची विजयी खूण दाखवली. उमेदवारांसोबत दोन जण मिळून एकूण तीन जणांना अर्ज सादरीकरणासाठी कार्यालयात प्रवेश देण्यात आला. इतरांना बाहेर थांबावे लागल्याने तेथे गर्दी दिसून आली.

काम करणाऱ्यावरच लोकांचा विश्वास

पणजी मनपा निवडणुकीत कोणच वजनदार उमेदवार नाही. उमेदवाराने नेमके काय काम केले? यावरच त्याचा विजय अवलंबून आहे. नावाने मते मिळत नाहीत. कामे करणाऱ्यावर लोकांचा विश्वास असतो, असे मत माजी महापौर उदय मडकईकर यांनी व्यक्त केले. राजधानी पणजीतील कॅसिनोची पाळे - मुळे आता खूप खोलवर गेली असून ते सत्य आता स्वीकारलेच पाहिजे. कॅसिनो नको म्हणून आम्ही विरोध केला होता पण मनपाचे अधिकार मर्यादित आहेत. मनपा व्यापारी परवाना देते. ते आणणे आणि बाहेर काढणे हे मनपाच्या हातात नाही. विरोधकांकडे कोणताही प्रभावी मुद्दा नसल्याने त्यांनी कॅसिनोच्या विषयावर राजकारण सुरु केल्याचे मडकईकर यांनी नमूद केले.

पणजीचे सौंदर्यीकरण, साधनसुविधा वाढवणार : रोहीत मोन्सेरात

महापौर रोहीत मोन्सेरात यांनी ‘आम्ही पणजीकर’ गटाला शुभेच्छा देताना सांगितले की, दोन्ही गटातील उमेदवार अनुभवी असून लोकांनाच आता त्यातून योग्य उमेदवार निवडायचा आहे. पणजी शहराचे महत्त्व पर्यटनासाठी वाढवावे म्हणून सौंदर्यीकरण, साधनसुविधा वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. पणजीचे पुनरुज्जीवन करणे, पणजीकरांच्या अडचणी, समस्या सोडवणे, शहराचा दर्जा उंचावणे याला महत्त्व देण्यात येणार असल्याचे मोन्सेरात यांनी नमूद केले. पणजी शहरातील स्मार्ट सिटीची 90 टक्के कामे पूर्ण झाली असून पणजी मनपाने करवाढ न करता पणजीकरांना दिलासा दिल्याचा दावा मोन्सेरात यांनी केला. पणजी मार्केट तिसऱ्या टप्प्याचे काम लवकरच सुरु होईल, असे ते म्हणाले.

एकूण 32 उमेदवारी अर्ज दाखल

पणजी मनपा निवडणुकीसाठी आतापर्यंत 32 उमेदवारांचे 32 अर्ज सादर झाले असून पुढील काही दिवसात तेवढ्याच संख्येने उमेदवारी अर्ज येतील असा अंदाज आहे. मंगळवार दि. 24 फेब्रुवारी ही अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख व मुदत असून त्याच दिवशी सायंकाळी अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. काल शुक्रवारी एकाच दिवशी 31 अर्ज सादर करण्यात आले असून सोमवार 23 व मंगळवार 24 रोजी सर्व उमेदवारांचे अर्ज येतील, अशी अपेक्षा आहे. सर्व प्रभागात जर दोन्ही गटांचे एकास एक उमेदवार असतील तर मनपा निवडणुकीत खऱ्या अर्थाने रंग भरणार असल्याचे मतदारांचे म्हणणे आहे.

सुरेंद्र फुर्तादो यांचा अर्ज सादर 

उत्पल पर्रीकर यांच्या ‘आम्ही पणजीकर’ या गटातर्फे माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी अर्ज सादर केला आहे. प्रभाग क्र. 9 मधून आपण अर्ज भरला असून पत्नीचा प्रभाग क्र. 6 हा ओबीसी राखीव झाला तर आपला पूर्वीचा प्रभाग क्र. 8 हा महिलांसाठी राखीव करण्यात आल्याने यंदा पत्नी निवडणुकीत नाही. आपला मुलगा लिओनी प्रभाग क्र. 7 मधून लढणार असल्याचे फुर्तादो म्हणाले. कोणाला निवडावे हे पणजीकरच ठरवतील. शेवटी ते पणजीकरांच्याच हातात आहे. पणजीकर गटाचे उमेदवार वैयक्तिक अर्ज भरणार आहेत. अर्जावर गटाचे नामोनिशाण नसते. गेली अनेक वर्षे पणजीतील जनतेला न्यायच मिळालेला नाही. आता देवच योग्य तो न्याय करेल, असे फुर्तादो म्हणाले.

Advertisement
Tags :

.