27 कंपन्यांचे पीएलआयअंतर्गत अर्ज मंजूर : केंद्रीय मंत्री
वृत्तसंस्था/ मुंबई
उत्पादन प्रोत्साहन योजनेअंतर्गत भारत सरकारने 27 कंपन्यांच्या अर्जांना मंजुरी दिल्याची माहिती मिळते आहे. इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान खात्याचे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे. आयटी हार्डवेअर क्षेत्रासाठी भारत सरकारने पीएलआय सवलतीची योजना लागू केली आहे.
याअंतर्गत 27 कंपन्यांचे अर्ज सरकारपाशी दाखल झाले आहेत यापैकी 23 कंपन्या उत्पादन प्रणालीला लागलीच प्रारंभ करणार असून चार कंपन्यादेखील उत्पादन कार्यामध्ये पुढील 90 दिवसांमध्ये लक्ष घालतील असे केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी सांगितले. या योजनेअंतर्गत आगामी काळामध्ये 3000 कोटी रुपयांची भर उद्योगात दिसून येणार असून 50000 जणांना प्रत्यक्षपणे आणि 1 लाख 50 हजार जणांना अप्रत्यक्षपणे रोजगार प्राप्त होऊ शकणार आहे. डेल, एचपी आणि लिनोवा या कंपन्यांनी आयटी हार्डवेअर उत्पादनासाठी पीएलआय योजनेअंतर्गत सरकारकडे अर्ज केला होता. पर्सनल कॉम्प्युटर्स, लॅपटॉप, टॅबलेट, सर्व्हर्स आणि इतर उत्पादनांच्या निर्मिती करिता सदरच्या कंपन्या प्रयत्न करणार आहेत. अर्ज मंजूर झालेल्या कंपन्यांमध्ये डेल, फॉक्सकॉन, एचपी, लेनोवो, व्हीव्हीडीएल, न्यूओ लिंक, भगवती, नेटवेब, आयएलपी, ऑप्टीमस यासारख्या कंपन्यांचा समावेश आहे. मंत्रिमंडळाने पीएलआय योजनेअंतर्गत आयटी हार्डवेअर उत्पादन घेण्यासाठी 17000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.