For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रितेश, गितेश, केतन यांचे अर्ज दाखल

01:29 PM Mar 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
रितेश  गितेश  केतन यांचे अर्ज दाखल
Advertisement

भाजपा-काँग्रेसकडून जोरदार शक्तीप्रदर्शन: निर्वाचन कार्यालयाजवळ घोषणांमुळे तणाव

Advertisement

फोंडा : संपूर्ण गोव्याचे लक्ष लागून राहिलेल्या फोंडा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपासह काँग्रेस आणि आम आदमी पक्ष मैदानात उतरले आहेत. येत्या दि. 9 एप्रिल रोजी ही निवडणूक होणार असून अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी दुपारपर्यंत सर्व तिन्ही पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज भरले. भाजपातर्फे दिवंगत आमदार व माजी कृषीमंत्री रवी नाईक यांचे पुत्र रितेश नाईक यांनी तर काँग्रेसतर्फे फोंड्यातील समाजकार्यकर्ते डॉ. केतन भाटीकर यांनी उमेदवारी दाखल केली. गीतेश नाईक यांनी आपतर्फे अर्ज भरला असून तिरंगी लढत होणार आहे.

भाजपा व काँग्रेस पक्षातर्फे मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची मिरवणूक काढीत जोरदार शक्तीप्रदर्शन घडवित उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. तिस्क फोंडा येथील सरकारी संकुलात असलेल्या निर्वाचन अधिकारी कार्यालयाजवळ दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाल्याने कार्यकर्त्यांना गेटबाहेर काढून परिस्थिती हाताळताना पोलिसांची बरीच दमछाक झाली.

Advertisement

भाजपाचे उमेदवार रितेश नाईक यांचा उमेदवारी अर्ज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत भरण्यात आला. प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, मगो पक्षाचे ज्येष्ठ नेते सुदिन ढवळीकर, बांधकाममंत्री दिगंबर कामत, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, प्रियोळचे आमदार गोविंद गावडे, माजी खासदार अॅड. नरेंद्र सावईकर यांच्यासह प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी, महिला मोर्चाच्या पदाधिकारी, जिल्हा पंचायत सदस्य व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. खडपाबांध येथील रवी नाईक यांच्या कार्यालयापासून निर्वाचन अधिकारी कार्यालयापर्यंत कार्यकर्त्यांची ढोल ताशा वादनासह भव्य मिरवणूक काढण्यात आली.फोंड्यात पुन्हा कमळ फुलणार : मुख्यमंत्री

गोव्यात भाजपा सरकारच्या कार्यकाळात आजवर झालेला चौफेर विकास आणि  स्व. रवी नाईक यांनी आपल्या चार वर्षांच्या कार्यकाळात फोंड्यात केलेला विकास हीच भाजपाचासाठी विजयाची खात्री आहे. रितेश नाईक यांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी कऊन रवी नाईक यांनी फोंड्यासाठी पाहिलेले स्वप्न पूर्ण करा. मतदारांचे प्रत्येक मत हे रवी नाईक यांना श्रद्धांजली असेल असे भावनात्मक आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. भाजपा व मगोचे नेते आणि सर्व कार्यकर्ते एकजुटीने रितेश नाईक यांच्या प्रचार कार्यात उतरणार आहेत. पक्षातंर्गत कुठलीही नाराजी नाही, असे स्पष्ट करीत फोंड्यात पुन्हा एकदा कमळ फुलणार आहे, असा दावाही त्यांनी केला.

रितेशच्या विजयासाठी मगोचे पूर्ण सहकार्य : सुदिन ढवळीकर

मंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले, रितेश नाईक यांना उमेदवारी देण्याची मागणी मगो पक्षाने यापूर्वीच केली होती आणि पूर्ण सहकार्याची हमीही दिली होती. युतीधर्माला पूर्णपणे जागून आम्ही प्रचारकार्यात उतरणार आहोत. मुळात फोंडा हा मगोचा पारंपरिक मतदारसंघ आहे. याठिकाणी सातवेळा मगो पक्षाचे आमदार निवडून आले आहेत. रवी नाईक यांच्या राजकीय कारकिर्दीला मगो पक्षातून आणि फोंड्यातून सुरुवात झाली होती. ज्या पद्धतीने लोकसभेच्या निवडणुकीत भाजपा उमेदवाराला मगो पक्षातर्फे आजवर जी मतांची मोठी आघाडी दिली गेली, तेवढीच मते पोटनिवडणुकीतही देण्याचे आश्वासन मंत्री ढवळीकर यांनी दिले.

दामू नाईक म्हणाले, पक्षाचे जुने आणि नवे कार्यकर्ते तसेच मगो पक्षाचे कार्यकर्ते एकजुटीने या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार रितेश नाईक यांच्यासाठी कार्य करणार आहेत. मंत्री दिगंबर कामत यांनी फोंडा मतदारसंघात रवी नाईक यांचा प्रभाव होता, आणि तो या निवडणुकीतही दिसणार आहे, असे नमूद केले. फोंड्यासाठी रवी नाईक यांचे योगदान लक्षात घेऊन त्यांचे पुत्र रितेश नाईक यांना उमेदवारी मिळायला हवी होती आणि भाजपाने योग्य निर्णय घेतलेला आहे. त्यांचा विजय निश्चित असल्याचा दावा मंत्री सुभाष शिरोडकर यांनी केला.

काँग्रेसतर्फे डॉ. केतन भाटीकरांनी भरला अर्ज

काँग्रेसचे उमेदवार डॉ. केतन भाटीकर यांनीही सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पक्षाचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमांव, राजेश वेरेकर, आमदार कार्लुस फेरेरा, महिला अध्यक्ष प्रतिक्षा खलप व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. आगियार मैदानापासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची मिरवणूक काढण्यात आली. डॉ. केतन भाटीकर आणि राजेश वेरेकर हे दोन्ही नेते एकत्र आल्याने काँग्रेसची ताकद दुपटीने वाढली आहे आणि हीच विजयाची खात्री असल्याचे माणिकराव ठाकरे म्हणाले.

जातीधर्मावर नव्हे, विकासावर बोलणार : डॉ. केतन भाटीकर

डॉ. केतन भाटीकर म्हणाले, आम्ही जाती धर्मावर बोलणार नाहीत, फोंड्याचा विकास हेच आमच्या प्रचाराचे मुख्य सूत्र आहे. फोंड्यात सुरक्षित रस्ते, स्वच्छ पाणी, आरोग्य या प्राथमिक सुविधा देण्यास भाजपा सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. आपवरही त्यांनी निशाणा साधताना भाजपाची ती बी टीम असल्याचा आरोप केला. फोंड्यातील मतदारांनी आमिषे आणि अपप्रचाराला बळी न पडता  विकासासाठी काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले. भाजपाच्या पराभवासाठी रिव्होल्युशनरी गोवन्सचे नेते विरेश बोरकर आणि मनोज परब यांच्यासह गोवा फॉरर्वर्डचे प्रमुख विजय सरदेसाई यांच्या सहकार्याबद्दल जाहीर आभार मानले.  गेली 14 वर्षे भाजपा सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले असून जनतेला परिवर्तन हवे आहे. 2027 च्या विधानसभेची नांदी फोंड्याच्या पोटनिवडणुकीतून होणार आहे. फोंड्यातील मतदार बदलाचा हा पायंडा घालणार आहेत, असे अमित पाटकर म्हणाले. केतन भाटीकर आणि आपण खांद्याला खांदा लावून प्रचार करणार असून मतदारांनी आमच्याविषयी अपप्रचारला बळी पडू नये असे राजेश वेरेकर यांनी सांगितले.

आपतर्फे गितेश नाईक रिंगणात

फोंडा पोटनिवडणुकीत आपही उतरला असून गितेश नाईक यांचा उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल करण्यात आला. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक, आमदार वेंझी व्हिएगश, आमदार क्रूझ सिल्वा, संदेश तेळेकर, अॅङ सुरेल तिळवे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. भाजपा आणि काँग्रेससाठी पोटनिवडणूक म्हणजे विकासाचे मुद्दे नसून सत्तेचे खेळ असल्याचा आरोप वाल्मिकी नाईक यांनी केला. आपच्या उमेदवाराला या पोटनिवडणुकीत एकच संधी द्या पुढील सहा महिन्यात फोंड्यातील उपजिल्हा इस्पितळासह अन्य ज्वलंत प्रश्न मार्गी लावू. आपची आश्वासने खोटी ठरल्यास येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनतेने वेगळा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

राज्यात बदल घडवून आणण्यासाठी आप हा समर्थ पर्याय आहे, असे आमदार वेंझी म्हणाले. भाजपा हे ‘कन्व्हर्जन’ सरकार असून शेती, डोंगर, जमिनी यासह आमदारही कन्व्हर्जन करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. या सरकारला धडा शिकवण्याची ही योग्य वेळ आहे. भाजपामध्ये घराणेशाही चालली असून फोंड्याच्या पोटनिवडणुकीत आपचे उमेदवार गितेश नाईक या भंडारी चेहऱ्याला संधी देण्याचे आवाहन त्यांनी केले. मतदारांकडून मिळणारा प्रतिसाद पाहिल्यास आपला विजय निश्चित असल्याचे गितेश नाईक म्हणाले.

Advertisement
Tags :

.