गुंठेवारी नियमित करण्यासाठी अर्ज प्रक्रीया सुरु ठेवा; आमदार सतेज पाटील यांची विधानपरिषदेत मागणी
कोल्हापूर प्रतिनिधी
राज्यातील गुंठेवारी प्रकरणे नियमित करण्यासाठी महापालिकांनी ठराविक मुदत न ठेवता ही प्रक्रिया सुरुच ठेवावी अशी मागणी विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी अधिवेशनात केली. यावर नगरविकास विभागाच्यावतीने उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याबाबत सरकार सकारात्मक असून प्रत्येक महापालिकेशी बोलून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
राज्यात 2020 पर्यंतची गुंठेवारी प्रकरणे नियमित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासाठी महापालिका ठराविक मुदत ठरवते. मुदतीत ज्यांचे अर्ज आले आहेत त्यांचीच प्रकरणे नियमित करणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगितले जाते. मात्र अनेकांनी यासाठी अर्ज केलेले नाहीत. सरकार 2020 पर्यंतचीच गुंठेवारी प्रकरणे नियमित करणार आहे. त्यामुळे ही अर्ज करण्याची प्रक्रिया सुरुच ठेवावी. अर्ज करण्यास महापालिकांना मुदतवाढ द्यावी, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली. यावर नागपूर महापालिकेच्याबाबतीत आपण हा मुदतवाढीचा निर्णय घेतला आहे. त्याच पध्दतीने प्रत्येक महापालिकेशी बोलून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे मंत्री सामंत यांनी सांगितले.