For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इमारत पूर्णत्व दाखल्यासाठी भरावा लागणार अर्ज क्रमांक एक

11:13 AM May 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
इमारत पूर्णत्व दाखल्यासाठी भरावा लागणार अर्ज क्रमांक एक
Advertisement

सरकारच्या नवीन आदेशामुळे पुन्हा डोकेदुखी वाढली; प्रक्रिया किचकट

Advertisement

बेळगाव : इमारत बांधून पूर्ण झाल्यानंतर महानगरपालिकेकडून इमारत नियमानुसार पूर्ण झाल्याचा दाखला दिला जातो. हा दाखला घेताना संबंधित मालमत्ताधारकांकडून अर्ज घेतला जात होता. मात्र आता अर्ज न घेता यापुढे अर्ज क्रमांक 1 भरून द्यावा लागणार आहे. याबाबत सरकारने नुकताच तसा आदेश बजावल्याची माहिती महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातून मिळाली आहे. सरकारकडून राज्यातील संपूर्ण महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतींना 26 मार्च 2024 ला हा आदेश बजावण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे इमारत बांधल्याचा पूर्णत्वाचा दाखला घेताना हा अर्ज भरावा लागणार आहे. पूर्णत्वाचा दाखला देताना महानगरपालिकेतील विविध विभागांना त्याचा सर्व्हे करावा लागणार आहे. त्यांनाही अर्ज क्रमांक 2 आणि 3 भरून द्यावा लागणार आहे. सर्व नियमानुसार इमारत बांधण्यात आली असेल तरच इमारत पूर्णत्वाचा दाखला मिळणार आहे.

अर्ज क्रमांक 1 सक्तीचा

Advertisement

इमारत बांधण्यासाठी परवानगी घेतली जाते. परवानगी घेताना महानगरपालिकेकडून ज्या अटी दिल्या जातात, त्यानुसारच इमारत बांधणे बंधनकारक आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे उल्लंघन झाल्यास पूर्णत्वाचा दाखला दिला जात नाही. यापूर्वी पूर्णत्वाच्या दाखल्यासाठी एका कोऱ्या कागदावर अर्ज लिहून दिला जात होता. मात्र यापुढे असे चालणार नाही तर त्यासाठी अर्ज क्रमांक 1 सक्तीचा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. मालमत्ताधारकाने अर्ज क्रमांक 1 दिल्यानंतर महानगरपालिकेतील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जावून इमारतीची पाहणी करावी लागणार आहे. नियमानुसार इमारतीचे बांधकाम झाले असेल तर तातडीने त्याचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यावा लागणार आहे. त्यानंतर सात दिवसांत संबंधित इमारत मालकाला पूर्णत्वाचा दाखला द्यावा लागणार आहे. एकूणच सरकारच्या या नव्या आदेशामुळे महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांबरोबरच इमारत मालकांनाही संपूर्ण कागदपत्रांची जुळवाजुळव करून अर्ज क्रमांक 1 भरून द्यावा लागणार आहे.

अर्ज क्रमांक एक भरताना लागणारी कागदपत्रे

  • इमारत मालकाचे संपूर्ण नाव
  • मालकाचा पत्ता व प्रभाग क्रमांक
  • मोबाईल क्रमांक
  • ई-मेल आयडी
  • इमारतीचा आराखडा आणि परवाना
  • इमारतीचा नकाशा
  • अभियंत्यांनी दिलेला प्रोजेक्ट
  • इमारत पूर्ण झालेली छायाचित्रे
  • पर्यावरणपूरक उपक्रमांची माहिती
  • पार्किंगसाठी सोडलेल्या जागेची माहिती
  • खाता उतारा
  • बोजा नसलेले प्रमाणपत्र
  • कर भरलेली पावती

उद्योजक किंवा इतर व्यावसायिकांसाठी आवश्यकतेनुसार लागणारी कागदपत्रे

  • उद्योग किंवा व्यवसाय करत असल्यास पर्यावरणाची परवानगी घेतलेले प्रमाणपत्र
  • उंच इमारत असल्यास अग्निशमन दलाचे  ना-हरकत पत्र
  • रेराची परवानगी असलेले प्रमाणपत्र
  • जिल्हाधिकाऱ्यांकडूनही काही ना-हरकतपत्रे घ्यावी लागणार
  • मनपाच्या मागणीनुसार इतर कागदपत्रे
Advertisement
Tags :

.