पेटीएमचा यूपीआय व्यवहारासाठी परवानगीचा अर्ज
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वन 97 कम्युनिकेशन लिमीटेड यांची सहकारी कंपनी पेटीएम यांचा युपीआय व्यवहारासंदर्भातील अर्ज नॅशनल पेमेंटस् कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)यांच्याकडे दाखल झाला असून त्यासंदर्भात पडताळणी करण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेने दिले असल्याची माहिती आहे.
थर्ड पार्टी अॅप्लिकेशन प्रोव्हायडर अंतर्गत युपीआय व्यवहार करण्यासाठी परवानगी मिळाल्यास पेटीएम अॅपच्या माध्यमातून कंपनीला आधीप्रमाणेच यूपीआयचा वापर करणे शक्य होणार आहे. अॅक्सिस बँकेनंतर एचडीएफसी बँक आणि यस बँक यांनी यूपीआय व्यवसायासाठी थर्ड पार्टी अप्लिकेशन प्रोव्हायडर बनण्याकरिता नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन संस्थेकडे अर्ज केला आहे.
युपीआय अर्थात युनिफाईड पेंमेंटस् इंटरफेसअंतर्गत मोबाईल फोनच्या माध्यमातून बँकेच्या मदतीने ऑनलाइन पैशांचे व्यवहार केले जातात. बऱ्याचशा खरेदी व्यवहारांकरीता युपीआयचा वापर आज सर्वत्र सर्रास होताना दिसतो आहे. एनपीसीआय संस्थेकडे यूपीआय आणि त्यासंबंधीत वित्तीय सेवांच्या नियमनाबाबत तसेच देखरेखीची जबाबदारी देण्यात आलेली आहे. मागच्या आठवड्यात पेटीएम आणि अॅक्सिस बँक यांनी वरीलप्रमाणे युपीआय व्यवहारासाठी अर्ज दाखल केले आहेत. अर्जाला मंजुरी मिळाल्यास पेटीएमला यूपीआय व्यवहाराचा मार्ग मोकळा होणार आहे.