‘अॅपल’भारतात आणखी 4 फ्लॅगशिप स्टोअर उघडणार
आता मुंबई आणि दिल्लीमध्येही एक स्टोअर : अॅपलने ओलांडला कमाईचा विक्रम
वृत्तसंस्था/ मुंबई
अॅपल येत्या काही महिन्यांत भारतात आणखी चार फ्लॅगशिप स्टोअर उघडणार आहे. सध्या मुंबई आणि दिल्लीत प्रत्येकी एक अॅपल स्टोअर आहे. कंपनीचे सीईओ टिम कुक यांनी तिमाही निकालादरम्यान ही घोषणा केली. आयफोनच्या वाढलेल्या विक्रीमुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. टीम कुक म्हणाले, प्रत्येक सेगमेंटमध्ये आयफोनची विक्री वाढली आहे, जागतिक स्तरावर नवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत.
भारतातही विक्रमी उच्च महसूल नोंदविला
अॅपलने सप्टेंबर तिमाहीत 94.9 अब्ज डॉलर जागतिक कमाई नोंदवली, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 6 टक्के जास्त आहे, असे कुक म्हणाले. केवळ आयफोनच्या कमाईत 6 टक्के वाढ झाली आहे. अॅपलचे सध्या भारतात 2 स्टोअर्स आहेत. अॅपलने 18 एप्रिल 2023 रोजी मुंबईत अॅपल बीकेसी स्टोअर आणि 20 एप्रिल रोजी दिल्लीत अॅपल सॉकेट स्टोअर उघडले. अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी या दोन्ही स्टोअरचे उद्घाटन केले.
आयपॅड कमाईत 8 टक्के वाढ
मुख्य वित्तीय अधिकारी लुका मेस्त्राr यांनी सांगितले की, आयफोन व्यतिरिक्त कंपनीच्या आयपॅडनेही भारतात कमाईचा विक्रम केला आहे. जागतिक स्तरावर, ते वर्षानुवर्षे 8 टक्के वाढले आहे. लुका म्हणाले, विकसित बाजारपेठेतील वाढीबरोबरच, आम्ही मेक्सिको, ब्राझील, मध्य पूर्व, भारत आणि दक्षिण आशियामध्ये दुहेरी अंकी वाढीसह अनेक उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये मजबूत कामगिरी पाहिली.
अॅपलचा विस्तार झपाट्याने छोट्या शहरांमध्ये
ज्येष्ठ संशोधन विश्लेषक प्रचीर सिंग म्हणाले, अॅपलने छोट्या शहरांमध्ये झपाट्याने विस्तार केला आहे. प्रीमियम स्मार्टफोनमध्ये ग्राहकांची गुंतवणूक वाढत आहे. अॅपल त्याच्या महत्वाकांक्षी प्रतिमेमुळे प्रीमियम खरेदीदारांसाठी सर्वोच्च पसंती बनली आहे.
भारताच्या स्मार्टफोन मार्केटमध्ये अॅपलचा 22 टक्के हिस्सा आहे. काउंटरपॉईंट रिसर्चनुसार, अॅपलचा आता भारताच्या स्मार्टफोन मार्केटमध्ये मूल्यानुसार 22 टक्के हिस्सा आहे, जो सॅमसंगनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. सणासुदीच्या आधी आयफोन 16 लाँच केल्याने अॅपलचे स्थान उंचावले आहे.