नूतनीकरण ऊर्जावाढीसाठी 100 कोटीची करणार अॅपल गुंतवणूक
त. भा. वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अमेरिकेतील दिग्गज टेक कंपनी अॅपल भारतात 100 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक हरित ऊर्जा वाढीसाठी केली जाणार असल्याची माहिती आहे.
येत्या काळात वरील गुंतवणूक केली जाणार आहे. याअंतर्गत 150 मेगावॅटपेक्षा अधिक हरित ऊर्जा स्थापित करण्यात येणार आहे. भारतात स्वच्छ ऊर्जा, प्लास्टिक प्रदूषण कमी करणे व ग्रीन स्टार्टअप्सला प्रोत्साहन देण्यासाठी कंपनीचे हे पाऊल असणार आहे. या नव्या गुंतवणुकीसोबत कंपनीने नूतनीकरण ऊर्जा विकासक क्लीन मॅक्ससोबत भागीदारी केली आहे. गुंतवणुकीतून बनलेली हरित ऊर्जा भारतातील अंदाजे 1.5 लाख भारतीयांच्या घरांपर्यंत पुरवण्यास सक्षम असेल, अशी योजना अॅपलने बनवली आहे. येणाऱ्या काळात यात आणखी वाढ करण्याचे नियोजन असणार आहे.
प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन
अॅपल कंपनी भारतातील आपली कार्यालये व रिटेल स्टोअर्सकरिता 100 टक्के नूतनीकरण ऊर्जा वापरण्यासंदर्भात सोलार प्रकल्पांवर काम करते आहे. याचबरोबर कंपनीने पर्यावरण क्षेत्रातील संघटना डब्ल्यूडब्ल्यूएफ-इंडियासोबत प्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी व रिसायकलींगसाठी काम करते आहे. गोव्यातील कचरा व्यवस्थापन संस्था साहस झिरो वेस्टच्या मॉडेलचे अनुकरण करायला सुरुवात केली आहे.