अॅपलकडून भारतात आयफोन उत्पादनात मोठी वाढ
एकंदर 25 टक्के निर्मिती : चीनवरील कटुतेचा फायदा
नवी दिल्ली :
अॅपल इंक आयफोन निर्माता कंपनीने भारतातील आयफोन निर्मितीमध्ये 25 टक्क्यांपेक्षा अधिक जागतिक वाटा उचलण्याचे उद्दिष्ट साध्य केले आहे. वर्ष 2025 मध्ये 55 दशलक्ष आयफोन्सची निर्मिती करण्यात आली आहे. आजघडीला पाहता अॅपल कंपनीची उत्पादन क्षमता मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये 53 टक्के इतकी झाली आहे.
2024 मध्ये अॅपल कंपनीने 36 दशलक्ष आयफोन्सची निर्मिती केली होती. गेल्या वर्षी उत्पादन क्षमता 55 दशलक्षवर पोहचली. जागतिक स्तरावरती पाहता वर्षाला अॅपल ही कंपनी जवळपास 220 दशलक्ष ते 230 दशलक्ष इतक्या आयफोन्सची निर्मिती करते. यामध्ये आता भारतात बनलेल्या आयफोन्सचा वाटा 55 दशलक्ष इतका अधिक दिसून आला आहे.
पीएलआयचा लाभ
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्पादन प्रोत्साहन योजनेचा म्हणजेच पीएलआय योजनेचा लाभ अॅपल कंपनीला झाला असून परिणामी कंपनीने उत्पादनामध्ये वाढ केलेली दिसून आली आहे. सध्याला तरी पाहता अॅपलचे सर्वाधिक उत्पादन चीनमध्ये होत आहे. अमेरिकेतील शुल्काच्या प्रश्नामुळे आता उत्पादन भारतातच अधिक करायचे कंपनीने ठरवले आहे. आजही तसे पाहता भारतामध्ये उत्पादनासाठी चीन व व्हिएतनामपेक्षा अधिक खर्च येतो. चीनवरील शुल्कामुळे अॅपल सध्या भारतावरच लक्ष केंद्रीत करतो आहे. सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आणि इतर कंपन्यांनी भारत सरकारच्या सहकार्यामुळे भारतातच उत्पादन अधिक वाढवले आहे. पीएलआय योजनेचा लाभ कंपन्यांनी पुरेपूर उठवला आहे.
अॅपल पेसाठी धडपड
या उत्पादनासंदर्भातील अनुदानाच्या लाभाची तारीख 31 मार्च रोजी संपत असून विविध कंपन्या सरकारशी याबाबत मुदत वाढवून देण्याबाबत चर्चा करत आहेत. अॅपलच्या आयफोनसह इतर उत्पादनांना भारतीयांकडून मिळणारा प्रतिसाद पाहून कंपनी आता पेमेंट प्रणालीसाठी अॅपल पे लॉन्च करायची योजना आखत आहे. उत्पादन वाढवण्यासोबत अॅपल पेच्या लाँचिंगकरीता कंपनीने प्रयत्न वाढवले आहेत.