अॅपलने आयफोन्ससह उत्पादने विमानाने अमेरिकेत पोहचवली
शुल्क टाळण्यासाठी अॅपलची अनोखी शक्कल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आयात शुल्काचा झटका वाचवण्यासाठी आयफोन निर्माती कंपनी अॅपलने जबरदस्त युक्ती लढवली. आयफोनसह आपली विविध उत्पादने अॅपलने भारत आणि चीनमधून 5 विमानाने अमेरिकेत पोहचवली असल्याची माहिती मिळते आहे. कर वाचवण्यासाठी कंपनीने गेल्या तीन दिवसात विमाने पाठवून आयफोनसह इतर उत्पादने अमेरिकेत पोहचती केली आहेत.
मार्चमध्ये विक्रमी निर्यात
ट्रम्प प्रशासनाकडून नव्या कर प्रणालीची अंमलबजावणी 9 एप्रिलपासून सुरु होणार आहे. याअगोदरच आयफोन निर्मात्या अॅपलने विमानाने तातडीने आपली उत्पादने अमेरिकेत पोहचवण्याची आगाऊ व्यवस्था केली आहे. दुसरीकडे मार्चमध्ये अॅपलने अमेरिकेला भारतातून मोठ्या प्रमाणात आयफोन्सची पाठवणी केली होती. 20 हजार कोटी रुपयांच्या आयफोन्सची निर्यात अमेरिकेला करण्यात आली आहे. वर्षाआधी याच महिन्यात निर्यात 11 हजार कोटी रुपयांची झाली होती.
किमती सध्या तरी वाढणार नाहीत
कराची घोषणा झाल्यानंतर आयफोन निर्माती कंपनी अॅपलने भारतात आयफोन्सच्या किमती वाढवण्याबाबत सध्या तरी योजना नसल्याचे म्हटले आहे.