अॅपलची 5 कंपन्यांसोबत भागीदारी
30 हजार कोटींची गुंतवणूक, 27 हजार जणांना नोकऱ्या
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आयफोन निर्माती कंपनी अॅपल यांनी 5 मोठ्या कंपन्यांसोबत भागीदारी करण्याचा निर्णय घेतला असून या अंतर्गत 30537 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. या नव्या गुंतवणुकीनंतर 27000 हून अधिक जणांना रोजगाराची संधी प्राप्त होणार असल्याची माहिती मिळते आहे.
कशासाठी गुंतवणूक
भागीदारी अंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स घटकांचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक ती गुंतवणूक वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. भारतामध्ये इलेक्ट्रॉनिक्स घटकांचे उत्पादन वाढीसाठी अॅपलने पाच कंपन्यांबरोबर भागीदारी केली आहे. इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंटस मॅन्युफॅक्चरिंग स्किम अंतर्गत 30537 कोटीची गुंतवणूक होणार आहे. सरकारकडून मंजूर झालेल्या 41863 कोटींच्या गुंतवणुकीपैकी सदरची गुंतवणूक ही 73 टक्के इतकी आहे. येणाऱ्या काळामध्ये 27600 जणांना रोजगारांच्या संधी प्राप्त होणार असल्याची माहिती आहे.
कोणत्या आहेत कंपन्या
सदरच्या कंपन्यांमध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्स, मदरसन इलेक्ट्रॉनिक कंपोनंटस, हिंडाल्को यांचा समावेश आहे. जागतिक कंपन्यांमध्ये पाहता युझान टेक्नॉलॉजी आणि एटीएल बॅटरी टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड यांचा समावेश आहे.