अॅपल आयफोन 16 प्रो ची निर्मिती भारतात
लाँचिंगनंतर असेंब्लीस प्रारंभ : चीनमधून भारतात प्रकल्पाचा विस्तार करण्याचा कंपनीचा मानस
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
अॅपल कंपनी लवकरच भारतात आयफोन 16 ची मालिका प्रो मॉडेल असेंबल करणार आहे. भारतामधील फॉक्सकॉनच्या तामिळनाडूतील श्रीपेरांबदुर येथील प्रकल्पामध्ये लवकरच उत्पादनास सुरुवात करण्यात येणार आहे. या असेंब्लीसाठी नवीन उत्पादन प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. तसेच अॅपलने आयफोन 16 प्रो आणि प्रो मॅक्सच्या निर्मितीसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासही सुरुवात केली आहे. या फोनच्या जागतिक लॉन्चनंतर त्यांची असेंब्ली भारतात सुरू होईल.अॅपल त्याच दिवशी मेड इन इंडिया आयफोन 16 उपलब्ध करून देईल ज्या दिवशी त्याची जगभरात विक्री होईल. कंपनीच्या एका अधिकाऱ्याच्या मते,अॅपल चीनच्या बाहेर आयफोन उत्पादनात विविधता आणणार आहे आणि भारतात उत्पादनाचा विस्तार करणार आहे. तसेच, महसुलाचे स्रोत भारतात स्थलांतरित करणार आहे.
भारतात आयफोन 15सह इतर मॉडेल बनवते
सध्या, अॅपल भारतात नवीन आयफोन 15 सह अनेक मॉडेल बनवते, परंतु उच्च-विशिष्टीकरण प्रो आणि प्रो मॅक्स मॉडेल नाही. अॅपल इंडियाच्या ऑपरेशन्सचे मूल्य देखील आर्थिक वर्ष 2024 मध्ये 1.97 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. भारतात अॅपलची विक्री 2023-24 या आर्थिक वर्षात विक्रमी 33 टक्क्यांच्या वाढीसह सुमारे 66,800 कोटी रुपये होती.