‘अॅपल’ चे सीईओ टिम कुक यांची ऐतिहासिक कामगिरी
अॅपल चे ज्येष्ठ अधिकारी टिम कुक यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा कंपनीने सोमवारी केली. या वर्षाच्या उत्तरार्धात होणाऱ्या या नेतृत्व बदलानुसार, कुक कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्याकडे जबाबदारी सोपवतील. अॅपलने जाहीर केले की, टिम कुक आता संचालक मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारतील.
अॅपलचे हार्डवेअर इंजिनिअरिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष जॉन टर्नस हे 1 सप्टेंबर 2026 पासून सीईओ पदाची जबाबदारी स्वीकारतील. 2011 मध्ये स्टिव्ह
जॉब्स यांच्या निधनानंतर कुक यांनी पदभार स्वीकारल्यानंतरचा हा सर्वात मोठा नेतृत्व बदल मानला जात आहे. टिम कुक 1998 मध्ये अॅपलमध्ये सामील झाले आणि 2011 मध्ये सीईओ झाले. गेल्या 15 वर्षांत त्यांनी कंपनीच्या इतिहासातील सर्वात परिवर्तनशील काळाचे नेतृत्व केले. त्यांच्या कार्यकाळात अॅपलची मार्केट कॅप सुमारे 350 अब्ज डॉलरवरून 4 ट्रिलियन
डॉलरपर्यंत वाढली, तर वार्षिक महसूल 2011 मधील 108 अब्ज डॉलरवरून 2025 मध्ये 416 अब्ज डॉलरपेक्षा अधिक झाला. कुक यांच्या नेतृत्वाखाली अॅपलने अॅपल वॉच, एअर पॉड्स आणि अॅपल व्हिजन प्रो यांसारख्या नवीन उत्पादन श्रेणी विकसित केल्या. तसेच आय क्लाउड ,अॅपल पे ,अॅपल टीव्ही प्लस आणि अॅपल म्युझिक यांसारख्या सेवांमधून कंपनीने 100 अब्ज डॉलरचा व्यवसाय उभारला. त्यांनी कंपनीला स्वत:च्या चिप्स विकसित करण्याच्या दिशेने नेले, जे अॅपलच्या इतिहासातील मोठे परिवर्तन मानले जाते. त्यांच्या कार्यकाळात कंपनीने कार्बन फूटप्रिंट 60 टक्के पेक्षा अधिक कमी केले आहे आणि 200 हून अधिक देशांमध्ये आपली उपस्थिती वाढवली आहे. ही एक ऐतिहासिक कामगिरी आहे. नवे सीईओ जॉन टर्नस हे दोन दशकांहून अधिक काळ अॅपलसोबत आहेत. त्यांनी 2001 मध्ये कंपनीच्या प्रॉडक्ट डिझाईन टीममध्ये प्रवेश केला. 2013 मध्ये ते हार्डवेअर इंजिनिअरिंगचे उपाध्यक्ष झाले आणि 2021 मध्ये कार्यकारी टीममध्ये सामील झाले.अॅपलच्या मते, त्यांनी
आयफोन,मॅक,आयपॅड,अॅपल वॉच आणि एअर पॉड्स यांसारख्या उत्पादनांच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली हार्डवेअर डिझाईनमध्ये मोठी प्रगती झाली असून, विशेषत: मॅक आणि नवीन आयफोन
मॉडेल्समध्ये सुधारणा करण्यात त्यांनी हातभार लावला आहे. टर्नस हे
अॅपलच्या कार्यकारी टीममधील सर्वात तरुण सदस्य आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडे दीर्घकालीन नेतृत्वाची क्षमता आहे. तसेच, ते अॅपलच्या हार्डवेअर व्हिजनचे नेतृत्व करतात, जे कंपनीच्या मुख्य व्यवसायांपैकी एक आहे, आणि त्यांच्यावर टिम कुक यांचा पूर्ण विश्वास आहे.अत्यंत गौरवास्पद आणि ऐतिहासिक कामगिरी करून टिम कुक सीईओ म्हणून निवृत्त होत आहेत. 192देशांपेक्षा बलाढ्या अशी अॅपल कंपनी त्यांनी घडवली आहे.आपण मात्र निवडणुका, क्रिकेट ,आयपीएल व बॉलिवूड धुरंदर अशांमध्येच गुंतून पडलेले आहोत. अॅपल कडून शिकण्यासारखे बरेच कांही आहे पण नवनिर्मितीच्या प्रवासांत जगात आपण अद्याप दखलपात्र का होत नाही याचा विचार करण्याची हीच योग्य वेळ आहे असे वाटते.
? प्रा.डॉ.गिरीश नाईक ,कोल्हापूर