For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काँग्रेसकडून तुष्टीकरणाचे राजकारण : पंतप्रधान मोदी

05:58 AM Nov 21, 2023 IST | Tarun Bharat Portal
काँग्रेसकडून तुष्टीकरणाचे राजकारण   पंतप्रधान मोदी
Advertisement

राजस्थानात भाजप विजयी झाल्यास पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त : मूल्यवर्धित कर कमी करण्याचे संकेत

Advertisement

राजस्थान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी पाली येथे प्रचारसभेला संबोधित केले आहे. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि राजस्थानातील अशोक गेहलोत सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच काँग्रेसवर तुष्टीकरणाचे राजकारण करण्याचा आरोप केला आहे.

आज आम्ही एक विकसित राष्ट्र निर्माण करण्यासाठी कठोर मेहनत करत आहोत. याकरता राजस्थानात विकासाला प्राथमिकता देणारे सरकार असणे आवश्यक आहे. तर काँग्रेससाठी भ्रष्टाचार आणि घराणेशाहीच्या राजकारणापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण काहीच नाही. काँग्रेस पक्ष तुष्टीकरणाच्या राजकारणाशिवाय कसलाच विचार करत नसल्याची टीका मोदींनी केली आहे.

Advertisement

राजस्थानात विकासाला सर्वोच्च प्राथमिकता देणारे सरकार असणे आवश्यक आहे. दुर्दैवाने येथे मागील 5 वर्षांपासून काँग्रेसचे सरकार राहिले असून त्याने येथील लोकांना विकासाच्या शर्यतीत मागे ढकलले आहे. येथील काँग्रेस सरकारने केवळ भ्रष्टाचारच केला असल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला आहे.

राजस्थानात इंधन दर अधिकार

राजस्थानातील पेट्रोलच्या अधिक दरावरून  मोदींनी अशोक गेहलोत सरकारवर निशाणा साधला आहे. राजस्थान सरकारच्या लुटीचे उदाहरण म्हणजे येथील पेट्रोलचे दर आहेत. राजस्थानलगतची राज्ये हरियाणा, उत्तरप्रदेश आणि गुजरातमध्ये भाजपचे सरकार आहे. तेथे पेट्रोल 97 रुपये प्रतिलिटर दराने मिळते. परंतु राजस्थानात काँग्रेसचे सरकार या राज्यांपेक्षा 12 रुपये अधिक दराने पेट्रोलची विक्री करत असल्याचे मोदींनी जनतेच्या निदर्शनास आणून दिले आहे.  3 डिसेंबरनंतर येथे भाजप सरकार स्थापन झाल्यावर पेट्रोल-डिझेलच्या किमतींची समीक्षा केली जाईल याची गॅरंटी राजस्थानला देतो. या निर्णयामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मोदींनी म्हटले आहे.

महिलाविरोधी गुन्ह्यात पहिल्या क्रमांकावर

राजस्थानातील अशोक गेहलोत सरकार हे महिलाविरोधी आहे. महिलाविरोधी काँग्रेस कधीच महिलांचे कल्याण आणि सुरक्षेचा विचार करू शकत नाही. काँग्रेसने राजस्थानला महिलांच्या विरोधातील गुन्ह्यांप्रकरणी देशात पहिल्या स्थानावर पोहोचविले असल्याची उपरोधिक टीका मोदींनी काँग्रेसवर केली आहे.

दंगलीची मानसिकता असणारे मोकाट

राजस्थानने मागील 5 वर्षांमध्ये बरेच काही झेलले आहे. येथील काँग्रेस सरकारने राजस्थानला दंगलीच्या आगीत लोटले आहे. राजस्थानात दंगली आणि दहशतवादी मानसिकता असणाऱ्यांना मोकाट सोडण्यात आले आहे. सौहार्दाच्या या भूमीवर कल्पनाही करता येणार नाहीत अशा घटना घडल्या आहेत असे मोदींनी म्हटले आहे.

नितीश कुमार लक्ष्य

काही दिवसांपूर्वी बिहारमध्ये ‘गर्विष्ठ’ आघाडीच्या एका नेत्याने जो तेथील मुख्यमंत्री आहे, त्याने दलित समुदायाच्या एका माजी मुख्यमंत्र्याला उद्देशून केलेली टिप्पणी अत्यंत आक्षेपार्ह होती. अशा प्रकारची टिप्पणी कुणी सामान्य नागरिक दैनंदिन संभाषणातही करत नाही. परंतु या गर्विष्ठ आघाडीच्या नेत्याने विधानसभेत हे पाप केले. तरीही काँग्रेसच्या एका नेत्याच्या तोंडातून याविरोधात अक्षरही निघाले नसल्याची टीका मोदींनी केली आहे. महिलांना आरक्षण देणारा कायदा संमत झाल्यापासून गर्विष्ठ आघाडीच्या नेत्यांनी महिलांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. या आघाडीच्या नेत्याने आमच्या माताभगिनींसाठी अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी केली. बिहारच्या मुख्यमंत्र्याने विधानसभेत महिलांबद्दल घोर अपमानास्पद शब्दांचा वापर केला, तरीही काँग्रेसचे नेते गप्पच बसून राहिले. हाच काँग्रेसचा खरा चेहरा असून तो राजस्थानच्या लोकांनी ओळखला असल्याचे मोदी म्हणाले.

Advertisement
Tags :

.