सफाई कर्मचाऱ्यांना आजच्या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन
बेळगाव : सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसदर्भात सफाई कामगार हितरक्षण समितीच्यावतीने सोमवार दि. 15 रोजी सुवर्ण विधानसौध परिसरात आंदोलन छेडले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर चर्चा करून पुढील रणनिती ठरविण्यासाठी शुक्रवार दि. 12 रोजी दुपारी 3 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात जिल्ह्यातील सफाई कामगारांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या 253 जणांना घरांचे हक्कपत्र, 396 मॅन्युअल स्कॅव्हेंजर म्हणून ओळखल्या गेलेल्या कुटुंबांना ओळखपत्र देणे, कंत्राटी पद्धत रद्द करून सर्वांना सेवेत कायम करणे, यासह विविध 17 मागण्यांसाठी हे आंदोलन केले जाणार आहे. याबाबतची पूर्व कल्पना राज्याचे समाजकल्याण मंत्री एच. सी. महादेवप्पा यांची भेट घेऊन सफाई कामगार हितरक्षण समितीच्यावतीने देण्यात आली आहे. त्यानुसार सोमवार दि. 15 रोजी आंदोलन केले जाणार असल्याने शुक्रवारच्या पूर्वतयारी बैठकीला जिल्ह्यातील सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन माजी नगरसेवक दीपक वाघेला, विजय निरगट्टी यांनी केले आहे.