होळी-रंगोत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन
मार्केट पोलीस स्थानकात शांतता समितीची बैठक
बेळगाव : सध्या बारावीची परीक्षा सुरू आहे. परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, याची काळजी घेत होळी व रंगोत्सव साजरा करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर यांनी केले. सोमवारी सायंकाळी मार्केट पोलीस स्थानकात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत त्यांनी वरील आवाहन केले. यावेळी पोलीस निरीक्षक विठ्ठल हावण्णावर यांच्यासह विजय जाधव, सुनील जाधव, बाबू पुजारी, मेघन लंगरकांडे, अजित कोकणे, विश्वजित हसबे आदींसह मार्केट पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील विविध गल्ल्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. रमजानचा महिना सुरू आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षाही आहे. होळी व रंगोत्सव शांततेत साजरा करावे. कायदा हातात घेण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, विद्यार्थ्यांवर, अनोळखी महिलांवर रंग ओतू नये, बेळगावच्या शांततेला धक्का पोहोचेल, असे कृत्य उत्सवाच्या काळात कोणीही करू नये, अशी सूचनाही पोलीस अधिकाऱ्यांनी केली.