गणेशोत्सव-ईद सण शांततेत साजरे करण्याचे आवाहन
बेळगाव : गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद सण शांततेने साजरे करण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी केले. गुरुवारी सायंकाळी केपीटीसीएल सभागृहात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत बोलताना त्यांनी वरील आवाहन केले. यावेळी मार्केटचे एसीपी संतोष सपनाईक, खडेबाजारचे एसीपी शेखरप्पा एच., बेळगाव ग्रामीणचे एसीपी गंगाधर एम. बी. आदी अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. माजी नगरसेवक नेताजी जाधव, रणजित चव्हाण-पाटील, सुनील जाधव, राहुल जाधव, अशोक चिंडक, रमेश सोंटक्की आदींसह विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. गणेश मंडपात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, सातत्याने स्वयंसेवक मंडपात असावेत, बॅनर लावताना यासाठी आवश्यक ती परवानगी घ्यावी, सण शांततेत व उत्साहात साजरे करण्यासाठी पोलीस दलाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. साऊंड सिस्टीमला फाटा देऊन पारंपरिक वाद्यांचा उत्सवाच्या काळात व मिरवणुकीच्या वेळीही वापर करण्यासंबंधी बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत शहरातील सर्व पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक उपस्थित होते.