सर्वसाधारण प्रवर्गात खुल्या गटातील उमेदवार द्यावा
माजी आमदार शिवराम दळवींचे आवाहन
सावंतवाडी । प्रतिनिधी
गेल्या पाच वर्षापासून तळागाळातील सर्वसामान्य कार्यकर्ते आपल्या हक्काच्या निवडणूकीसाठी आसुसलेले होते. अखेर निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर केल्या असून प्रथम नगरपालिका ,नगरपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सरकारचे आणि निवडणूक आयोगाचे विशेष आभार मानायलाच हवेत. पण , आता होणाऱ्या निवडणुकांमध्ये सर्वसाधारण प्रवर्गात खुल्या गटातीलच उमेदवार सर्व पक्षांनी द्यायला हवा. अशी विनंती भाजपचे सक्रिय कार्यकर्ते तथा माजी आमदार शिवराम दळवी यांनी केली आहे. ते म्हणाले खरंतर सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुल्या गटातील व्यक्तींना संधी एकदाच येते व अशावेळी इतर मागास प्रवर्ग मधील उमेदवारांनी सर्वसाधारण प्रवर्गात उभे राहू नये. त्यातून खुल्या गटातील व्यक्तींवर अन्याय होईल. आणि हा अन्याय योग्य नाही. प्रत्येक प्रवर्गात त्या त्या गटातीलच उमेदवारांनी आपले मत आजमवावे. सर्वसाधारण प्रवर्गात जरी कुणालाही निवडणूक लढवता येऊ शकते असे असले तरी घटनेप्रमाणे जसा प्रवर्ग दिला आहे त्या प्रवर्गाचा आदर करायला हवा. सर्वसाधारण प्रवर्गात खुल्या गटात मराठा ,ब्राह्मण ,ख्रिश्चन, मुसलमान जैन आधी घटकातील जातीतील लोक समाविष्ट आहेत. मग अशाच व्यक्तींना सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी देणे आवश्यक आहे. तरच खऱ्या अर्थाने लोकशाहीचा आणि घटनेचा आदर केला जाईल. अन्यथा, अन्य जातीतील व्यक्ती सर्वसाधारण प्रवर्गात उमेदवारी अर्ज दाखल करून कित्येक वर्षानंतर खुल्या गटातील व्यक्तींना संधी मिळत असते आणि ती संधी हुकली जाते त्यामुळे कुठलाही जातीभेद न करता सर्वसाधारण प्रवर्गात खुल्या गटातीलच व्यक्तींना मिळणे आवश्यक आहे. सत्ताधारी तसेच विरोधी पक्ष यांनी आता होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये त्या दृष्टीने विचार करावा . सर्वसाधारण प्रवर्गात खुल्या गटातील व्यक्ती निवडणूक लढवण्यास इच्छुक असतात . अशावेळी त्यांच्यावर अन्याय होऊ नये एवढीच अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीने दक्षता घ्यावी असे श्री दळवी म्हणाले.