एलिव्हेटेड ट्रॅकसाठी डॉ.कोरेंना साकडे
आवाज उठविण्याची केली मागणी
बेळगाव : बेळगाव शहरातील होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी रेल्वे उड्डाणपुलांना पर्याय म्हणून एलिव्हेटेड ट्रॅकची आवश्यकता आहे. एलिव्हेटेड ट्रॅक झाल्यास शहरात कोठेही वाहतूक कोंडी अथवा रेल्वे उड्डाणपुलांवर गर्दी होणार नसल्याने हा प्रकल्प शहराच्या विकासात भरच घालेल यासाठी आपण आवाज उठवावा, असे साकडे टिळकवाडी येथील नागरिकांनी पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांना घातले.
शनिवारी रहिवाशांनी डॉ. कोरे यांची भेट घेऊन त्यांना एलिव्हेटेड ट्रॅकविषयी माहिती दिली. नागपूर शहराप्रमाणेच बेळगावमध्येही एलिव्हेटेड टॅक झाल्यास अनेक समस्या सुटणार आहेत. शहरात प्रत्येक ठिकाणी रेल्वे गेटवर उ•ाणपूल झाल्यास समस्या अधिक वाढणार आहेत. भांदूर गल्ली, तानाजी गल्ली येथील उड्डाणपुलांमुळे आजही त्रास सहन करावे लागत आहेत. तसेच येथील व्यवसायही पूर्णपणे ठप्प झाला आहे.
रेल्वे प्रशासनाकडून टिळकवाडी येथील दुसरे रेल्वेगेट येथे उड्डाणपूल उभारण्यासाठी हालचाल सुरू आहे. त्या ऐवजी केंद्रस्तरावर एलिव्हेटेड ट्रॅकचा प्रस्ताव मांडावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी टिळकवाडी परिसरातील नागरिक उपस्थित होते.