आपले काम राष्ट्रीय कर्तव्य म्हणून पार पाडूया
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ दहीकर यांचे आवाहन ; 26/ 11 च्या हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली
कुडाळ -
आपण आपले काम राष्ट्रीय कर्तव्य म्हणून पार पाडूया. कारण त्यातून कुणाकडून गैरप्रकार होणार नाहीत व देशामध्ये देश विघातक शक्ती वाढणार नाहीत. त्यासाठी नाक, कान, डोळे उघडे ठेवून सजग होऊन आजूबाजूला पाहा. संशयास्पद गोष्टी सुरक्षा यंत्रणेच्या नजरेस आणा. शिस्त, संयम पाळून श्रद्धेने राष्ट्रहित समोर ठेवून आपले काम करा. हीच शहिदांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे उद्गार जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी बुधवारीं येथे काढले. कुडाळ - एमआयडीसी येथील बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये 26 नोव्हेंबर 2008 मध्ये मुंबई येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना व त्यात बळी पडलेल्या निरपराध नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून डॉ दहिकर बोलत होते. अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, ५८ महाराष्ट्र बटालियनचे सी. ओ. कर्नल अजय राज एल व त्यांचे सहकारी सीएचएम प्रदीप पाटील तसेच संस्था चेअरमन उमेश गाळवणकर,अमृता गाळवणकर, कुडाळ तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष विजय पालकर, नीलेश जोशी, प्रा अरुण मर्गज, प्रा. परेश धावडे व विविध शिक्षणक्रमाचे प्राचार्य उपस्थित होते.डॉ दहिकर म्हणाले, आजच्या युवा पिढीच्या मनात धगधगत्या राष्ट्र प्रेमाची ज्योत तेवत ठेवण्याच्या दृष्टीने 26 /11 च्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना व त्यात मृत्युमुखी पडलेल्या निरपराध नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम फारच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. 26 /11 च्या दहशतवादी हल्ल्यातील काही हृदयद्रावक क्षण त्यांनी उपस्थितांसमोर समोर कथन केले व शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून मानवंदना दिली. बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या क्रीडांगणावर स्तंभ उभारून त्यावर शहीद जवानांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. अजय राज एल म्हणाले,समर्थ भारत,विकसित भारत बनवायचे असेल तर सच्चे दिल से आपले देशाप्रतीचे कर्तव्य निष्ठेने पार पाडूया. देशाला घडविणाऱ्या युवा पिढीला आचरण व विचारातून सशक्त बनवूया. त्यासाठी असे उपक्रम त्यांच्यासमोर ठेवणे गरजेचे असल्याचे सांगितले. या शिक्षण संस्थेच्या प्रांगणाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या संविधान स्तंभाला उपस्थित मान्यवरानी पुष्प अर्पण करून मानवंदना दिली.एनसीसी छात्रांच्या वतीने मान्यवरांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. यावेळी शिक्षण संस्थेच्या विविध शिक्षणक्रमाचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.