भंडाऱ्याची उधळण अन् चांगभलंचा गजर
आप्पाचीवाडी-कुर्लीत हालसिद्धनाथ यात्रेला उत्साहात प्रारंभ : पालखी सोहळ्याला अलोट गर्दी, भाविकांसाठी मोफत अन्नदानाची व्यवस्था
वार्ताहर/कोगनोळी
श्री क्षेत्र आप्पाचीवाडी-कुर्ली (ता. निपाणी) येथील श्री हालसिद्धनाथ देवाच्या भोंब यात्रेला शुक्रवार दि. 18 ऑक्टोबर रोजी अमाप उत्साहाने व भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. आप्पाचीवाडी येथील खडक मंदिरात सर्व मानकरी व पुजारी यांच्या हस्ते कर बांधून यात्रेला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी यात्रा कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत पालखी सबिना पार पडला. सकाळी 10 वाजता मानाची घोडी, पालखी ढोलच्या गजरात कुर्ली येथून हालसिद्धनाथांचे सर्व मानकरी व भाविक आप्पाचीवाडीकडे रवाना झाले. घुमट मंदिर येथे धार्मिक विधी झाल्यानंतर आप्पाचीवाडी-कुर्ली पालखी मिरवणूक वाडा मंदिराकडे रवाना झाली. वाडा मंदिरात धार्मिक विधी पार पडला. वाडा मंदिरातून उत्सव मूर्ती व पालखी खडक मंदिराकडे रवाना झाली. खडक मंदिर येथे येऊन पालखी सबिना मंदिर प्रदक्षिणा करून मंदिरात आली. या ठिकाणी उत्सव मूर्तीची प्रतिष्ठापना करून कर बांधण्यात आली. यावेळी धार्मिक विधी व ढोल वादनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी भाविकांतर्फे भंडाऱ्याची मुक्तपणे उधळण करण्यात आली. त्यामुळे मंदिर परिसर पिवळा धमक होऊन गेला होता. 19 रोजी रात्री ढोल जागर व श्रींची पालखी सबिना (प्रदक्षिणा), 20 रोजी रात्री श्रींची पालखी सबिना (प्रदक्षिणा) व रात्री पहिली भाकणूक होणार आहे.
मंगळवारी होणार सांगता
21 रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून या दिवशी दिवसभर महानैवेद्य, रात्री श्रींची पालखी सबिना (प्रदक्षिणा) झाल्यानंतर रात्री दुसरी भाकणूक होणार आहे. मंगळवार दि. 22 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजता घुमटातील मंदिरात भाकणूक झाल्यानंतर दुपारी 4 वाजता श्रींची पालखी सबिना (प्रदक्षिणा) होऊन यात्रेची सांगता होणार आहे. यात्रा काळात प्राथमिक आरोग्य केंद्र, सौंदलगा यांच्यावतीने मोफत आरोग्य सेवा देण्यात येत आहे. तसेच यात्राकाळात पाच दिवस शाळा आवारात श्री हालसिद्धनाथ सेवा संस्थेतर्फे भाविकांसाठी मोफत अन्नदानाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. भाविकांसाठी कोल्हापूर, कागल, निपाणी, चिकोडी, रायबाग, गारगोटी व संकेश्वर येथून जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. यात्रेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून निपाणीचे मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार व निपाणी ग्रामीण पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी यांच्या नेतृत्वाखाली फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.