मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडून माफी
गुजराती लोकांबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याने वाद
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केरळ विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गुजराती समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी माफी मागितली आहे. ‘माझ्या निवडणूक प्रचारातील भाषणाती वक्तव्याचा हेतुपुरस्सर विपर्यास केला जात आहे. तरीही, मी जबाबदारी स्वीकारून माझ्या वतीने खेद व्यक्त करतो.’ असे ट्विट करत खर्गे यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिलगिरी व्यक्त केली. माझ्या मनात गुजरातच्या लोकांबद्दल नेहमीच सर्वोच्च आदर होता आणि राहील. त्यांच्या भावना दुखावण्याचा माझा कधीच हेतू नव्हता, असेही मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांच्या सोशल मीडिया खात्यावर पुढे लिहिले.
अलीकडेच, केरळमध्ये प्रचार करत असताना, खर्गे यांनी एका सभेला संबोधित केले होते. या सभेत त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. मात्र, या भाषणादरम्यान त्यांनी गुजरातच्या लोकांचा उल्लेख केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. ‘मोदीजी, तुम्ही गुजरातच्या निरक्षर लोकांना फसवू शकता, पण केरळच्या लोकांना फसवू शकत नाही.’ असे वक्तव्य खर्गे यांनी केले होते. काँग्रेस अध्यक्षांच्या वक्तव्याचा भाजप नेत्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला होता. गुजरातविरोधी द्वेष पसरवणे विरोधी पक्षाच्या डीएनएमध्येच आहे, असा आरोप करत भाजपने त्यांच्या माफीची मागणी केली होती.