दीपावलीसंबंधी ब्रिटनकडून क्षमायाचना
वृत्तसंस्था / लंडन
ब्रिटनच्या सरकारने दीपावली कार्यक्रम साजरा करताना झालेल्या एका चुकीसाठी तेथील भारतीय वंशाच्या लोकांकडे क्षमायाचना केली आहे. ब्रिटनचे सर्वोच्च नेते केर स्टार्मर यांच्या अधिकृत सरकारी निवासस्थानी दीपावलीचा उत्सव साजरा करण्यात आला होता. त्या उत्सवात सहभागी झालेल्यांना बकऱ्याच्या मांसाचे कबाब, मत्स्यान्न, मद्य असे पदार्थ खाण्यासाठी वाढण्यात आले होते. हे वृत्त प्रसिद्ध होताच ब्रिटनमधील भारतीय वंशाच्या नागरीकांनी संताप व्यक्त केला होता.
दीपावलीच्या उत्सवात सामिष अन्न न खाण्याचा दंडक आहे. हा दंडक स्टार्मर यांच्या निवासस्थानी पाळला गेला नाही. त्यामुळे ब्रिटनमधील भारतीय वंशाच्या अनेक नागरीकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या. समाज माध्यमांवरही बऱ्याच संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यामुळे स्टार्मर यांच्या निवासस्थानाच्या व्यवस्थापनाला त्याची चूक कळून आली. सामिष अन्न देण्याचा हा प्रकार अनवधानाने घडला असून कोणाच्याही भावना दुखावण्याचा व्यवस्थापनाचा हेतू नव्हता. झाल्या चुकीच्या संदर्भात व्यवस्थापन क्षमायाचना करीत आहे, असे पत्रक व्यवस्थापनाकडून नंतर प्रसिद्ध करण्यात आले आहे. स्टार्मर ब्रिटनचे सर्वोच्च नेते झाल्यापासूनचा त्यांचा हा प्रथमच दीपोत्सव होता. त्यामुळे ही चूक घडली असल्याचे स्पष्टीकरणही नंतर त्यांच्या निवासस्थानाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे.