पीडितांची माफी मागितली, दहशतवाद्यांची नाही : विरेन सिंह
इंफाळ :
मणिपूरचे मुख्यमंत्री एन. विरेन सिंह यांनी मी केवळ पीडितांची माफी मागितली आहे, अन्य कुणाची नाही असे स्पष्ट केले आहे. तर माफी मागितल्याप्रकरणी काँग्रेस समवेत काही पक्षांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले होते. मी पीडितांबद्दल दु:ख व्यक्त केले होते, ज्या लोकांना त्रास सहन करावा लागतोय, ज्यांनी स्वकीयांना गमावले आहे अशा लोकांची मी माफी मागितली. मी दहशतवाद्यांची माफी मागितलेली नाही असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
मे 2023 पासून मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसेवरून मुख्यमंत्री सिंह यांनी 2024 च्या अखेरच्या दिवशी स्थितीवर दु:ख व्यक्त करत माफी मागितली होती. याप्रकरणी काँग्रेस आणि भाकपने मुख्यमंत्र्यांनी केवळ माफी मागणे पुरेसे नसल्याची टिप्पणी केली होती. मैतेई आणि कुकी समुदायांदरम्यान झालेल्या हिंसेत 250 हून अधिक जणांना जीव गमवावा लागला आहे. तसेच हजारो लोकांना स्वत:चे घर सोडावे लागले आहे.